संजय राऊतांकडून काँग्रेसला जिंकवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीची दिशाभूल : निलेश राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : काँग्रेसला जिंकवण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीत फूट पाडण्याचे काम केले. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार बेळगावात हरला, तर फक्त शिवसेना जबाबदार असेल, अशा शब्दात माजी खासदार निलेश राणे यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडले. संजय राऊत यांनी स्वतः बेळगावात जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी प्रचार केला आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकांच्या प्रचारतोफा थंडावल्या आहेत.

“महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार बेळगावात हरला तर फक्त शिवसेना जबाबदार. काँग्रेसला जिंकवण्यासाठी संजय राऊत यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीची दिशाभूल केली आणि महाराष्ट्राची बाजू कमजोर करण्याचं पाप शिवसेनेने केले. जी एकी समितीमध्ये होती, त्याच्यामध्ये फूट पाडण्याचे काम राऊतांनी केले.” असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.

भाजप खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येत्या 17 एप्रिलला बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून 2 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत भाजपकडून सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी आणि काँग्रेसचे आमदार सतीश जारकीहोळी रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके अशी टक्कर आहे.

शिवसेनेतर्फे के. पी. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र मराठी मतांची विभागणी टाळण्यासाठी त्यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर शिवसेनेने महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे बेळगाव पोटनिवडणुकीची लढत तिरंगी झाली आहे. काँग्रेसचे सतीश जारकिहोळी हे मूळचे गोकाक भागातील असल्याने त्यांना गोकाक आणि अरभावीतील मतदारांसह कन्नड भाषिक तसेच दलित आणि मुस्लिम समाजाचा पाठिंबा आहे. एकूण 10 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत.

शुभम शेळके यांचं वय अवघे 26 वर्ष आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने शुभम विक्रांत शेळके यांचा फॉर्म भरला होता. समिती कार्यकर्त्यांनींच त्यांचं डिपॉझिट भरले. सर्वसामान्य कुटुंबातील असणारे शुभम शेळके यांचा लहानपणापासूनच सीमाप्रश्न जवळचा संबंध होता.

सुरेश अंगडी यांनी सलग चार वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. 2004 मध्ये ते भाजपचे जिल्हाध्यक्ष होते, त्याचवेळी पक्षाने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. तत्कालीन खासदार अमरसिंग पाटील यांचा पराभव करून अंगडी लोकसभेवर निवडून गेले. सुरेश अंगडी यांच्या विजयात मराठी मतांचा वाटा सर्वाधिक होता. 2004 पाठोपाठ 2009 आणि 2014 मध्येही त्यांना मराठीबहुल भागात सर्वाधिक मते मिळाली. 2019 मध्ये मराठीबहुल भागात त्यांचे मताधिक्‍य कमी होईल, असा दावा विरोधकांकडून केला जात असताना उलट त्यांचे मताधिक्‍य वाढले होते.

You might also like