कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील रेठरे येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची पूर्वप्रक्रिया सुरू झाली आहे. सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून शुक्रवारी कारखान्याच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांची नियुक्ती केली आहे, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कराडचे उपनिबंधक मनोहर माळी यांच्यासह तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, 19 मेपासून कृष्णा कारखान्यांचा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होण्याची शक्यता असून मतदान 26 तर निकाल 28 जूनला होण्याची शक्यता आहे.
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम झाली असून, 47 हजार 160 मतदार आहेत. मतदार यादी अंतिम झाल्याच्या तारखेपासून 10 दिवसानंतर व 20 दिवसांच्या आत कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम कायद्यानुसार जाहीर होणार आहे. त्यानुसार 15 ते 25 मे दरम्यान कधीही निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.
कारखान्याच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर व सहायक निवडणूक अधिकारी म्हणून कराडचे उपनिबंधक मनोहर माळी यांच्यासह तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम तयार करून त्यास निवडणूक प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठविला असल्याचे सूत्रांकडून समजते. मंजुरीनंतर कारखान्याच्या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. अद्याप कृष्णाच्या निवडणुकीचा रणसंग्राम अधिकृतरित्या जाहीर झालेला नाही.