हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) अखेरच्या ओव्हरमध्ये टिच्चून गोलंदाजी करत भारताचा विजय सोप्पा केला. हार्दिकच्या या दमदार कामगिरीमुळे सध्या संपूर्ण देशभर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र याच हार्दिकला काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या आयपीएलमध्ये टीकेचा सामना करावा लागला होता. भर मैदानात क्रिकेटप्रेमी त्याला ट्रॉल करत होते. या एकूण सर्व परिस्थितीवरून हार्दिकचा भाऊ आणि क्रिकेटर कृणाल पंड्याने (Krunal Pandya) भाष्य करत सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. एक भाऊ म्हणून मला त्याच्यासाठी खूप वाईट वाटले. त्याने या काळात खूप काही सहन केले. शेवटी तो देखील एक माणूस आहे त्यालाही भावना आहेत असं कृणाल पंड्याने म्हंटल आहे.
कृणाल पांड्याने पोस्टच्या माध्यमातून म्हटले की, हार्दिक आणि मी व्यावसायिक क्रिकेट खेळायला सुरुवात करून जवळपास एक दशक पूर्ण झाले आहे. मागील काही दिवस एखाद्या स्टोरीसारखे होते. ज्याचे आपण स्वप्न पाहिले होते ते अखेर सत्यात उतरले आहे. प्रत्येक देशवासीयांप्रमाणे मी देखील या क्षणाचा आनंद घेत आहे. मी माझ्या भावाकडे पाहून खूप भावुक झालो आहे. हार्दिकसाठी गेले सहा महिने सर्वात कठीण गेले आहेत. त्याच्यासोबत खूप वाईट झाले. तो केवळ याच्यासाठी पात्र नव्हता हे मला कळते. म्हणूनच एक भाऊ म्हणून मला त्याच्यासाठी खूप वाईट वाटले. त्याने या काळात खूप काही सहन केले. शेवटी तो देखील एक माणूस आहे त्यालाही भावना आहेत. हार्दिक कसा तरी हसत हसत या सगळ्यातून बाहेर पडला, तरीही मला माहित आहे की त्याला हसणे किती कठीण होते.
तो कठोर परिश्रम करत राहिला आणि विश्वचषक मिळविण्यासाठी त्याला काय करावे लागेल यावर लक्ष केंद्रित केले कारण ते त्याचे अंतिम उद्दिष्ट होते. भारताचे दीर्घकाळचे स्वप्न साकार करण्यासाठी त्याने खूप चांगली कामगिरी केली. त्याच्यासाठी यापेक्षा मोठे काहीच नाही. वयाच्या ६ व्या वर्षापासून देशासाठी खेळणे आणि विश्वचषक जिंकणे हे स्वप्न होते. मी फक्त लोकांना आठवण करून देऊ इच्छितो की हार्दिकने त्याच्या कारकिर्दीत इतक्या कमी कालावधीत जे केले ते अविश्वसनीय आहे. राष्ट्रीय संघासाठी त्याने खूप काही केले. प्रत्येक वेळी, हार्दिकच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, लोकांनी त्याला हिणवले आहे आणि यानेच त्याला आणखी मजबूत केले. हार्दिकने नेहमीच सर्वप्रथम देशाचा विचार केला. बडोद्याहून आलेल्या एका लहान मुलासाठी आपल्या संघाला विश्वचषक जिंकून देण्यात मदत करण्यापेक्षा मोठी कामगिरी असू शकत नाही. हार्दिक, मला तुझा खूप अभिमान आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तू प्रत्येक आनंदासाठी आणि तुझ्या मार्गावर येणाऱ्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी पात्र आहेस. माय बच्चू, मला तुझ्याबद्दल खूप आदर आहे, अशा शब्दांत कृणाल पांड्याने हार्दिक बद्दलचे त्याचे प्रेम व्यक्त केलं.