कुसूरला ग्रामपंचायत निवडणुकीत भोसले- उंडाळकर गट एकत्र : आ. पृथ्वीराज चव्हाण गट विरोधात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | कुसूर येथील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे डाॅ. अतुल भोसले आणि अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर गट एकत्रित लढत आहे. तर विरोधात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा गट निवडणूक लढवत असल्याने काॅंग्रेसमधील काका- बाबा गट एकमेकां विरोधात आमनेसामने आहे. त्यामुळे कराड दक्षिण मतदार संघात कुसूर गावची निवडणूक चांगलीच चर्चेत आलेली आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत बहुमत एका गटाला तर सरपंच पद दुसऱ्या गटाला मिळाले होते.

कराड तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी अनेक इच्छुकांनी माघार घेतल्याने काही ग्रामपंचायती पूर्णत तर काही अंशत बिनविरोध झाल्या आहेत. अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर गटातटाचे राजकारण पहायला मिळत आहे. त्यामुळेच कुसूर येथे भोसले- उंडाळकर गट एकत्र तर बाबा गट विरोधात लढत असल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या निवडणुकीत 9 जागापैकी भोसले – उंडाळकर 6 तर बाबा गटाला 3 जागा मिळाल्या होत्या. परंतु लोकनियुक्त सरपंच पदावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाने बाजी मारली होती.

कुसूर येथे शेतकरी ग्रामविकास पॅनेलचे नेतृत्व विकास अधिकराव कदम, संभाजी हिंदुराव देशमुख हे करत आहेत. तर जोतिर्लिंग ग्रामविकास पॅनेलचे नेतृत्व सतिश विश्वासराव पाटील हे करत आहेत. लोकनियुक्त सरपंच आपल्याच गटाचा व्हावा, याकरिता दोन्ही गटाकडून जय्यत तयारी सुरू आहे.

भोसले- उंडाळकर गटाकडून उदयसिंह आनंदराव कदम तर बाबा गटाकडून रमेश आण्णासो पाटील हे लोकनियुक्त सरपंच पदासाठी रिंगणात आहेत. संरपंच पदी उसयसिंह आनंदराव कदम बाजी मारण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत रणनितीमध्ये झालेल्या चुका सुधारुन शेतकरी ग्रामविकास पॅनेलचे विकास कदम यांनी जोरदार फिल्डींग लावल्याने यंदा बहुमतासोबतच सरपंचपदही काबिज करणार असल्याचा दावा मोरे, कदम व देशमुख यांच्याकडून केला जात आहे.