हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज शासकिय शालेय शिक्षण विभागाच्या (Ministry of School Education) खात्यातून तब्बल 47 लाख 60 हजार चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित आरोपींनी शालेय शिक्षण विभागाचे बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरी वापरून चार टप्प्यांमध्ये 47 लाख 60 हजार रुपये चोरी केले आहेत. याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलीस या चोरीमागे नेमका कोणाचा हात आहे याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून पैसे चोरीला गेल्यामुळे विभागात खळबळ उडाली होती. या प्रकरणचा तपास करताना पोलिसांच्या लक्षात आले की, विभागाच्या खात्यातून तब्बल 47 लाख 60 हजार रुपये चोरीला गेले आहेत. तसेच चोरी करण्यात आलेली रक्कम नमिता बग, प्रमोद सिंग, तप कुमार, झितन खातून यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या चौघांवर 419, 420, 465, 467, 471, 473, 34 भादवी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच हे चारजण कोण आहेत? याचा तपास पोलीस करत आहेत.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, शासकिय विभागाच्या खात्यातून पैसे चोरीला जाण्याची ही दुसरी घटना घडली आहे. गेल्या महिन्यातच पर्यटन विभागाच्या खात्यातून 47 लाख लाख चोरीला गेले होते. याचा तपासही मरीन ड्राईव्ह पोलीस करत आहे. या दरम्यानच आता शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून 47 लाख 60 हजार चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत. दरम्यान, शालेय विभागाची ही रक्कम मंत्रालयात जी बँक आहे तिथून चोरीला गेली आहे. या कारणामुळेच शासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.