Ladaki Bahin Yojana| महायुती सरकारने सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना महाराष्ट्रामध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेल्या या योजनेस महिला मोठ्या संख्येने प्रतिसाद देत आहेत. या योजनेद्वारे महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. त्यामुळे आता लाभार्थी महिला फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र आता त्यांची ही आतुरता संपली आहे. कारण आजपासून अनेक महिलांच्या खात्यात या योजनेचे हप्ते जमा झाले आहेत.
फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ एकत्र (Ladaki Bahin Yojana)
महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वीच घोषणा केली होती की, या योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मार्च महिन्याच्या हप्त्यासोबत एकत्र जमा केला जाणार आहे. त्यामुळे पात्र महिलांना 3000 ची रक्कम एकाच वेळी मिळणार आहे. त्यानुसार, 7 मार्च 2025 पर्यंत ही रक्कम लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. ज्यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. महिला दिनाच्यानिमित्ताने सरकारने ही रक्कम 7 मार्च रोजी जमा केली आहे.
बँकेत पैसे जमा झाले की नाही असे पहा (Ladaki Bahin Yojana)
- बँकेकडून SMS – योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्यावर बँकेकडून एसएमएस येईल.
- बँक बॅलन्स चेक एसएमएस सेवा – काही बँका त्यांच्या ठराविक क्रमांकावर एसएमएस पाठवल्यावर बॅलन्स तपासण्याची सुविधा देतात.
- टोल-फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल – अनेक बँका ग्राहकांना मिस्ड कॉलद्वारे बॅलन्स तपासण्याची सेवा पुरवतात.
- नेट बँकिंग, गुगल पे, फोन पे – या माध्यमातूनही तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आलेत की नाही, हे तपासू शकता.
- एटीएम किंवा बँकेत भेट – तुमच्या डेबिट कार्डचा वापर करून एटीएममधून ‘लास्ट ट्रान्झॅक्शन हिस्ट्री’ पाहता येईल, तसेच थेट बँकेत जाऊनही खात्याची माहिती मिळवता येईल.
योजनेंतर्गत अर्जांची छाननी सुरूच राहणार
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की, योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पात्रता आणि अपात्रता ठरवण्यासाठी अर्जांची छाननी ही सतत सुरू असणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे कोणत्याही महिलेला जर योजना मिळत नसेल, तर त्या त्यांच्या अर्जाच्या स्थितीबाबत अधिकृत संकेतस्थळावर किंवा स्थानिक प्रशासन कार्यालयात चौकशी करू शकतात.
दरम्यान, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाखो महिलांना दोन महिन्यांचे पैसे मिळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या रकमेचा लाभार्थी महिलांना मोठा फायदा होणार आहे. परंतु ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी वरील दिल्याप्रमाणे आपल्या बँक स्टेटस चेक करावे.