सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
संजयनगर परिसरात असणाऱ्या मंगळवार बझार परिसरातील एका भंगाराच्या दुकानाला शॉर्ट सर्किटने भीषण आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले होते. या भीषण आगीमुळे या दुकानाशेजारील तीन घरांमध्ये आग लागून संसारुपयोगी साहित्य जाळले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
तब्बल तासाच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. संजयनगर परिसरातील मंगळवार बझार रोडवर तुकाराम पवार यांचे स्क्रॅप मटेरियलचे दुकान आहे. या दुकान गळ्यात प्लास्टिक, ऑइल, प्लास्टिक पासून बनविलेल्या वास्तू तसेच जळावू साहित्य मोठ्या प्रमाणात होते.
दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक प्लास्टिकच्या साहित्याला आग लागली. बघता बघता आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले होते. अचानक घडलेल्या या घटनेनं पवार यांच्यासह दुकानातील कामगार आणि शेजारी राहणाऱ्या नागरिकांची मोठी धावपळ उडाली होती.