हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्र सरकार (Central Government) औरंगजेबाच्या (Aurangjeb) कबरीच्या देखभालीसाठी भारतीय पुरातत्त्व खात्याकडून दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. अशातच दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला तुटपुंजा निधी दिला जात असल्याने हिंदु जनजागृती समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. समितीने या संदर्भात सरकारकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीसाठी 2021-22 मध्ये तब्बल 2,55,160, तर 2022-23 मध्ये 2,00,626 रुपये खर्च करण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांत हा खर्च 6.50 लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. याउलट, महाराष्ट्राच्या ऐतिहासिक अस्मितेचे प्रतीक असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी राज्य सरकारकडून केवळ 250 इतकाच निधी दिला जातो, ही बाब संतापजनक असल्याचे समितीने नमूद केले आहे.
शिवरायांना दुर्लक्षित करणे योग्य आहे का?
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी आदर्श आहेत. त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. अशा महापुरुषांच्या मंदिरासाठी शासनाकडून अपुरा निधी दिला जात असताना, औरंगजेबाच्या कबरीसाठी मोठा खर्च केला जाणे योग्य आहे का? असा सवाल हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी उपस्थित केला आहे.
औरंगजेबाच्या कबरीची मदत थांबवा!
महत्वाचे म्हणजे, हिंदु जनजागृती समितीने केंद्र आणि राज्य सरकारकडे जोरदार मागणी केली आहे की, औरंगजेबाच्या कबरीसाठी केला जाणारा निधी तातडीने थांबवावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या देखभालीसाठी आवश्यक त्या आर्थिक तरतुदी कराव्यात. सरकारने महाराष्ट्राच्या अस्मितेचा विचार करून त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा याविरोधात व्यापक आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही समितीने दिला आहे.
दरम्यान, औरंगजेबाच्या कबरीसाठी दिला जाणारा निधी हा राजकीय वर्तुळात वादाचा मुद्दा ठरला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार विरोधकांना कसे तोंड देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर, दुसऱ्या बाजूला शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे सरकार शिववास्तूंच्या निधीसाठी अधिक निधी देईल का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.