औरंगाबाद | साल्याच्या अंत्यविधीसाठी मुंबईला गेलेल्या कंपनीतील अधिका-याचे घर फोडून चोरांनी पंधरा तोळ्याचे सोन्या-चांदीचे दागिने लांबविल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना १७ ते २२ जुलै दरम्यान प्रतापनगरातील कासलीवाल रेसीडेन्सीमध्ये घडली. या घटनेमुळे प्रतापनगर भागात दहशत पसरली आहे. विशेष म्हणजे या परिसरातील कोणत्याही अपार्टमेंटमध्ये सीसी टिव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाही.
शहरातील एका कंपनीत गुणवंत शांताराम पाटील (५५, रा. सी-२/४, कासलीवाल रेसीडेन्सी, प्रतापनगर) हे अधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या मुंबई येथील साल्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यामुळे पत्नी नूतन यांच्यासह ते विक्रोळी भागात १७ जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास विक्रोळी येथे गेले होते. अंत्यविधी आटोपल्यानंतर औरंगाबादला यायचे असताना पावसामुळे पाटील कुटुंब मुंबईतच अडकून पडले. दरम्यान, २२ जुलै रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास पाटील यांच्या फ्लॅटसमोरील रामभाऊ बल्लाळ यांच्या दरवाजाला बाहेरुन कडी लावण्यात आल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी शेजा-यांना फोन करुन दरवाजाबाहेरील कडी उघडण्यास सांगितले. बल्लाळ हे बाहेर येताच त्यांना पाटील यांच्या दरवाजाचे लॅच तोडल्याचे निदर्शनास आले.
पाटील यांचे घर फोडण्यात आल्याचे लक्षात येताच बल्लाळ यांनी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. त्यानंतर पाटील यांनी घरातील कपाटात सोन्याचे दागिने असल्याचे बल्लाळ यांना सांगत तपासण्याचे सांगितले. त्यानुसार, बल्लाळ यांनी घराची तपासणी केली. तेव्हा कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. यानंतर आज सकाळी आठच्या सुमारास पाटील कुटुंबिय शहरात दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती उस्मानपुरा पोलिसांना दिली. पुढे श्वानपथक, फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांनी धाव घेत माग काढण्याचा प्रयत्न केला.