केरळमधील भीषण भूस्खलनात 5 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी मागितली हवाई दलाची मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

इडुक्की । केरळमधील इडुक्की जिल्ह्यात मुन्नार येथून २५ किमी अंतरावर भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० जणांची सुखरुप सुटका करण्यात आल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. दुर्घटना स्थळी अजून काही लोक अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात असून प्रशासनाकडून मदत व बचाव कार्य सुरु आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच वनअधिकारी तसंच इतर विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. भूस्खलन झालेल्या परिसरात ७० ते ८० लोक वास्तव्यास असून या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० जणांना वाचण्यात आलं.

तालुका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘गावाला जोडणारा पूल पावसात वाहून गेला असल्याने तिथे पोहोचण्यात अनेक अडचणी आहेत. सतत सुरु असलेल्या पावसामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे.मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी भारतीय हवाई दलाकडे मदत मागितली असून ट्विटदेखील केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी घटनास्थळी एनडीआरएफ टीम दाखल झाली असल्याची माहिती दिली आहे.

“भूस्खलन झाल्याने अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफचं पथक पाठवण्यात आलं आहे, पोलीस, अग्निशमन दल, वन तसंच महसूल अधिकारी यांना बचावकार्यात सहभागी होण्याचा आदेश दिला आहे. अजून एक टीम लवकरत घटनास्थळी दाखल होणार आहे,” अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये दिली आहे. केरळच्या आरोग्य मंत्री केके शैलजा यांनी मोबाइल मेडिकल टीम आणि १५ रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या असल्याची माहिती दिली आहे. रुग्णालयांना उपचारासाठी सज्ज राहण्याची सूचना करण्यात आलेली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”