हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मागील 2 दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. सर्वत्र पाणी साचल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. रायगड जिल्ह्यात सुद्धा पावसाची रिपचिप सुरूच असून याठिकाणी खालापूर येथे एका गावावर काल रात्री दरड कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तब्बल 70- 80 दबल्याची माहिती समोर येत आहे. याठिकाणी एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं आहे.
खालापूरच्या इर्शालगडावरील चौक गावापासून 6 किलोमीटर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या बाजूला आदिवासींची वाडी आहे. याच वाडीवर रात्री दरड कोसळली. या गावातील सर्वच्या सर्व 40 घरे दरडीखाली आली आहेत. त्यामुळे 70 ते 80 जण दरडीखाली दबली गेली. या दुर्घटनेनंतर आजूबाजूच्या गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. तसेच अग्निशमन दल आणि एनडीआरएफची टीमही घटनास्थळी धाव घेतली.
संपूर्ण परिसरात फक्त चिखलच दिसत असूनढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. दरडीसोबत मातीचा प्रचंड ढिगारा घरंगळत खाली आल्याने या गावातील घरे जमीनदोस्त झाले आहेत. अवघ्या काही मिनिटांतच होत्याचं नव्हतं झालं आहे. या दुर्घटनेमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते.