औरंगाबाद – पुण्याला लोखंडी सळई घेऊन जाणाऱ्या चालत्या ट्रकला स्कॉर्पिओने आडवून लुटणाऱ्या टोळीचा वाळूज पोलिसांनी मंगळवारी पर्दाफाश केला. या टोळीकडून तब्बल २३ लाख रूपयांच्या मुद्देमालासह चौघा दरोडेखोरांना पोलिस पथकाला अटक करण्यात यश मिळाले. तर अद्याप गुन्ह्यातील काही आरोपी फरारी आहेत. दरोड्याच्या घटनेनंतर अवघ्या सहा दिवसांत दरोडेखोरांची टोळी जेरबंद केल्याने परिसरातून पोलिस पथकाचे कौतुक होत आहे.ट्रकचालकाच्या तक्रारीवरून वाळूज पोलिसांनी दरोड्याच्या गुन्ह्याची ११ ऑगस्ट रोजी नोंद केली. त्यानंतर गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांची पाच पथके तयार केली. ही पथके नाशिक, नगर तसेच औरंगाबाद ग्रामीण भागात पाठविण्यात आली. या भागातील काही गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिस पथकाने दरोडेखोरांचा मागोवा काढला.
या कामी काही तांत्रिक मुद्दे लक्षात घेऊन दरोड्यातील आरोपींचा शोध घेतला असता त्यात आकिब हारून मनियार (रा.सय्यद सादात चौक, संगमनेर, जि.नगर) , मोहम्मद सालेम जमीर कुरेशी (मोगल मोहल्ला, संगमनेर जि.नगर), नितीन अशोक जगताप (रा.साईलक्ष्मी नगर, कोपरगाव), नासेर गुलाब शेख (रा.साकुर , संगमनेर, जि.नगर ) या दरोडेखोरांचे निष्पन्न झाले. त्यांनी इतर सहकार्यांच्या मदतीने दरोडा टाकल्याची कबूली दिली. गुन्ह्यातील ट्रक हा नाशिक जिल्ह्यातील घोटी येथून पोलिसांनी ताब्यात घेतला. तर कोपरगाव येथील नितीन जगताप, तर संगमनेरचा नासेर शेख या दोघा आरोपींनी गुन्ह्यातील १९ टन २० किलो वजनाच्या सळ्या पोलिसांच्या ताब्यात दिल्या. दरोडेखोरांनी मुद्देमाल लंपास करण्यासाठी वापरलेली दोन वाहने असा मिळून सुमारे २३ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. तर इतर फरार दरोडेखोर लवकरच अटक करण्यात यश येईल, असा विश्वास पोलिस निरीक्षक संदिप गुरमे यांनी व्यक्त केला.
सहायक पोलिस निरीक्षक विनायक शेळके, पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे, गोरख चव्हाण, सहायक पोलिस उपनिरीक्षक सलिम शेख, पोलिस अंमलदार प्रदीप बोरूडे, सचिन राजपुत्र, सलिम शेख, पंकज गायकवाड, पांडुरंग शेळके, शिवराज खाकरे यांच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. पोलिसांनी ११ लाख रुपयांच्या लोखंडी सळई व पाच लाख रुपयांचा ट्रक असा मिळून १६ लाख रूपयांच्या दरोड्याच्या गुन्ह्याची नोंद केली होती.