औरंगाबाद : शहर व जिल्ह्यामध्ये दर शनिवार आणि रविवार विकेंड लॉकडाऊन लावण्याचा निर्णय प्रशासनाने दोन आठवड्यांपूर्वी घेतला होता. त्यानुसार काल व परवा शहरात नागरिक व व्यापा-यांच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र आज सोमवारी बाजारपेठा उघडताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गुलमंडी, पैठणगेट, कुंभारवाडा, रंगारगल्ली आदी भागांत काही प्रमाणात दुकाने उघडताच नागरिकांनी गर्दी केली.
दोन दिवसांच्या दिवसांच्या बंदमुळे व लॉकडाऊनचा निर्णय अद्याप अधांतरी असल्याने व्यापारीही संभ्रमावस्थेतच असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी दुकानमालकांनी सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली. काही ठिकाणी दुकाने चालू तर काही ठिकाणी बंद असल्याकारणाने व्यापा-यांसोबत नागरिकही संभ्रमावस्थेत होते. ज्या व्यावसायिकांनी दुकाने उघडली, त्या दुकानदारांना दुकान बंद करण्याचे पोलिसांकडून आदेश देण्यात असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे व्यापारी द्विधा मन:स्थितीत असल्याचे एकंदरीत चित्र निर्माण झाले होते.
काही व्यापा-यांनी तर शासनाने लवकरात लवकर जनजीवन सुरळीत करावे व दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी भूमिका मांडली. राज्यात कोरोनाची गंभीर स्थिती निर्माण झाली असताना लॉकडाऊनमुळे आर्थिक घडी विस्कटू नये, अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून व्यापारीपेठा, बाजारपेठा, उद्योग व्यवसायांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे निदान आता तरी सरकारने लॉकडाऊन लावू नये, अशीच व्यापारीवर्गासह सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आहे