मागील २४ तासांत देशात कोरोना रुग्णसंख्येत धडकी भरवणारी वाढ; मृतांचा आकडा पोहोचला..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकड्यामध्ये मागील २४ तासांत आणखी भर पडली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मागील २४ तासांत देशात ३७,७२४ कोरोनाबाधित रुग्ण नव्यानं आढळले आहेत. परिणामी देशातील एकूण रुग्णसंख्या ११ लाख ९१ हजार ९१५ पर्यंत पोहोचली आहे.

कोरोना रुग्णवाढीचा वेग असाच कायम राहिल्यास येत्या काही दिवसांमध्ये हा आकडा १२ लाखांच्या घरात पोहोचण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, आरोग्य खात्याच्या माहितीनुसार सध्या देशभरात ४ लाख ११ हजार १३३ रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरु आहेत. तर, आतापर्यंत ७,५३,०५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाच्या विळख्यात अल्यामुळं आतापर्यंत २८,७३२ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले असल्याची माहिती केंद्रिय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली.

२१ जुलैपर्यंत देशात १कोटी ४७लाख २४हजार ५४६ जणांच्या कोरोना चाचण्या झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना चाचण्यांची संख्या वाढवल्यामुळं आणि अनलॉकचे टप्पे सुरु झाल्यामुळं कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं निदर्शनास आलं होतं. परिणामी अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आढळल्यामुळं राज्यातील अनेक जिल्हे सध्या लॉकडाऊनमध्येच आहेत. तर, अनलॉक झालेल्या ठिकाणांवरही काही नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश शासन आणि आरोग्य यंत्रणांकडून देण्यात आले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”