सुशांत सिंह राजपूतच्या अखेरच्या सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज होणार; चाहत्यांची उत्सुकता वाढली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ‘दिल बेचारा’ या अखेरच्या चित्रपटाचा ट्रेलर आज (6 जुलै) दुपारी लॉन्च होणार आहे. कोरोनाव्हायरसमुळे हा चित्रपट थिएटरऐवजी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. डिस्ने प्लस हॉटस्टार या अ‍ॅपवर सुशांतच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर प्रदर्शित होण्याच्या काहीतास आधीच ट्विटरवर #DilBecharaTrailer हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे. सुशांतच्या नजरा या ट्रेलरकडे लागल्या आहेत. आज सगळे रेकॉर्ड मोडायचे असा इरादा सुशांतचे चाहते बोलून दाखवत आहेत.

या सिनेमात सुशांतसोबत संजना सांघी मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमातून ती चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. तर दिग्दर्शक मुकेश छाब्रा याचाही हा पहिलाच चित्रपट आहे. खरंतर हा चित्रपट नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित होणार होता. परंतु काही कारणांमुळे तो लांबणीवर पडला. आता हा चित्रपट 24 जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार ओटीटी प्लॅटफार्मवर प्रदर्शित होणार आहे. ‘दिल बेचारा’ सिनेमा हॉलिवूडच्या ‘द फॉल्ट इन अवर स्टार्स’ या सिनेमाचा रिमेक असल्याचं म्हटलं जात आहे. ही कहाणी कॅन्सरग्रस्त जोडप्याची आहे. आपला शेवट आनंदी नसणार हे माहित असूनही ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईच्या वांद्र्यातील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर सुशांतच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सुशांतचा अखेरचा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहून त्याला श्रद्धांजली द्यावी, अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा होती. पण कोरोनाच्या संकटामुळे हे शक्य झालं नाही. चित्रपटातील मुख्य अभिनेत्री संजना सांघीने चाहत्यांना आवाहन केलं आहे की, चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्यासाठी हट्ट करु नका. सोशल मीडियावर एका पत्रकाद्वारे तिने म्हटलं आहे की, ‘पडदा सध्या मोठा नसला तरी आपलं मन तर मोठं होऊ शकतं. एक महान आयुष्य आणि चित्रपटचा आनंद व्यक्त करण्याची ही वेळ आहे.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”