टीम, HELLO Maharashta : १९९५ नंतर सलग पाच वेळेस विधानसभेवर निवडून येणारे झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपचे बंडखोर नेते माजी मंत्री सरयू रॉय यांनी त्यांचा पराभव केला आहे. जमशेदपूर पूर्व विधानसभा निवडणुकीत रघुवर दास विरुद्ध सरयु रॉय यांच्यामध्ये लढत झाली. या लढतीकडे सर्वांचे लक्ष्य लागले होते. भाजपचे बंडखोर नेते सरयू यांनी अपक्ष निवडणूक लढवत रघुवर दास यांचा पराभव केला. सरयू रॉय यांना जमशेदपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे तिकीट नाकारण्यात आले होते. म्हणून ते पक्षावर नाराज होते. या निवडणुकीत काँग्रेस नेते गौरव वल्लभ देखील रिंगणात होते. त्यांना ९ % मते मिळाली आहेत. सरयू रॉय यांना ४३ % मते मिळाली आहेत तर रघुवर दास यांना ३३% मते मिळाली आहेत.
झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेस सोबत आघाडी करणाऱ्या झारखंड मुक्ती मोर्चाला या निवडणुकीत घवघवीत यश मिळताना दिसत आहे.काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले असून झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कमलेशकुमार सिंग देखील या निवडणुकीत निवडून आले आहेत.