वरळी : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी वरळी येथील मागासवर्गीय वसतिगृहाला आज अचानक भेट दिली. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या एका मेसेजवर त्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.
वसतीगृहातील समस्यांविषयी येथील विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. त्या आंदोलनाची दखल घेऊन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी या वस्तीगृहाला भेट दिली. त्यांनी म्हंटले की, मी स्वत: वसतिगृहात राहून शिक्षण घेतले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणीला सामोरे जायला नको अशी व्यवस्था करण्याची जबाबदारी माझी आहे.
बीडीडी चाळ येथील वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी होणाऱ्या असुविधांबाबत आंदोलन केले होते. यापुढे विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागणार नाही असा शब्द मुंडे यांनी दिला आहे. विद्यार्थ्यांच्या एका मेसेजवर मी त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करेन, असेही ते म्हणाले. वरळी वसतिगृहात १५ दिवसांत सोयीसुविधा देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. मुंबईमध्ये मुलामुलींच्या वसतीगृहासाठी नव्याने बांधकाम सुरु आहे. ते काम पुर्ण होईपर्यंत येथील वसतिगृहाला आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा देण्यात येतील. त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यातील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निवासाची, भोजनाची व इतर शैक्षणिक सुविधांबाबत लवकरच आढावा घेवून निर्णय घेण्यात येईल.