हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात T-20 क्रिकेटची लोकप्रियता चांगलीच वाढत आहे. जगातील अनेक देशात T-20 लीग स्पर्धा होत असतात. आपल्या भारतात सुद्धा इंडियन प्रीमिअर लीग (IPL) दरवर्षी होते. मात्र आता IPL च्या धर्तीवरच BCCI स्वतःची लीजंड्स खेळाडूंची लीग (Legend League) सुरू करण्याच्या विचारात आहे. या लीग मध्ये सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, सेहवाग आणि युवराज यांच्यासारखे भारतीय क्रिकेटवर एकेकाळी अधिराज्य गाजवलेले निवृत्त खेळाडू आपल्याला खेळताना दिसू शकतात. असं झाल्यास भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी हा मोठा आनंदाचा क्षण ठरेल.
अलीकडेच भारताच्या काही माजी खेळाडूंनी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची भेट घेतली आणि त्यांना लीजेंड्स लीग आयोजित करण्याची विनंती केली. आयपीएलप्रमाणे लिजेंड्स लीगचे आयोजन असावे अशी माजी क्रिकेटपटूची इच्छा आहे.म्हणजेच वेगवेगळ्या शहरांच्या नावाने संघाची नावे असावी. आयपीएल प्रमाणेच या स्पर्धेत सुद्धा जगभरातील निवृत्त खेळाडूंसाठी बोली लावावी अशी माजी खेळाडूंची इच्छा आहे. आता हे किती शक्य आहे याचा विचार बीसीसीआय करत आहे. जे हे शक्य झालं तर आयपीएल प्रमाणेच लिजंड लीगचा आनंद भारतीय क्रिकेटप्रेमींना घेता येणार आहे.
याला दुजोरा देताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्हाला या संदर्भात माजी क्रिकेटपटूंकडून प्रस्ताव आला असून, त्यावर विचार केला जात आहे. मात्र, सध्या तरी हा प्रस्ताव सुरुवातीच्या टप्प्यावर आहे. हि लीग यंदा सुरु होण्याची शक्यता नाही मात्र पुढच्या वर्षी लिजंड लीगचा विचार करता येईल. महत्वाची बाब म्हणजे या स्पर्धेत आयपीएलमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंना संधी मिळणार नाही तर जगभरातील निवृत्त झालेल्या खेळाडूंना खेळता येईल . बीसीसीआयने लीग सुरू केल्यास, ही कोणत्याही क्रिकेट बोर्डाने आयोजित केलेली पहिलीच लीजेंड्स लीग असेल. सध्या होत असलेल्या सर्व लीग खासगी आहेत.