औरंगाबाद – धावत्या मोटरसायकलवर बिबट्याने हल्ला केल्याने एक महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील लाडगाव-कापूसवाडगाव रस्त्यावर घडली. मीना परशुराम मुठ्ठे (वय 45) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव असून, सदर महिला ही कापूसवाडगाव येथील रहिवासी आहे.
या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, मीना मुठ्ठे पति परशुराम मुठ्ठे व त्यांचा मुलगा रविवारी रात्री लाडगावहुन कापुसवाडगाव येथे आपल्या घरी मोटरसायकलने जात असताना कापुसवाडगावजवळ अंधारात झुडपात लपलेला बिबट्या मोटरसायकलच्या पाठीमागून धावत येऊन पाठीमागे बसलेल्या मिना यांचे हात जबड्यात धरल्याने मिना मोटरसायकल वरुन खाली पडल्या. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मीना यांनी जोरजोरात आरडाओरड केल्याने घटना स्थळावरुन बिबट्याने धूम ठोकली.
दरम्यान, जखमी झालेल्या मीना यांना पती परशुराम यांनी वैजापूर शहरातील दवाखान्यात उपचारासाठी भरती केले. या विषयी दवाखान्याचे डॉ. ईश्वर अग्रवाल यांनी सांगितले की जखम मोठी असल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाले असून मीना यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर विरगाव पोलिस व वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले असून रात्री उशीरापर्यन्त बिबट्याचा शोध सुरु होता.