व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

बिबट्या फासकीत : डाॅग स्काॅडच्या मदतीने आरोपीला अटक

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील खोडशी येथील कृष्णा नदीकाठी लावलेल्या फासामध्ये बिबट्या अडकल्याची घटना काल मंगळवारी दि. 9 रोजी पहाटे 5 वाजता उघडकीस आली. नदीकाठी फासकी लावणाऱ्या संशयितास वनविभागने ताब्यात घेतले आहे. बाबू सखाराम जाधव (वय ४५, सध्या रा. खोडशी, कायम राहणार गोपाळनगर कार्वे) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.

वनविभागाने दिलेली माहिती अशी, याप्रकरणी वन विभागाने तपासाची चक्रे फिरवत काल रात्री उशिरा फास लावणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या. विशिष्ट फास कोठून आणली यासह अन्य गोष्टीचा वनाधिकारी कसून चौकशी करत आहेत. मंगळवारी सकाळी खोडशी गावाच्या हद्दीत सावकार मळा परिसरात बिबट्या लोखंडी फासामध्ये अडकल्याची माहिती खोडशी गावाचे पोलीस पाटील यांनी दूरध्वनीवरून वनविभागाला दिली. त्यानंतर कऱ्हाडमधील वनक्षेत्रपाल तुषार नवले आपल्या पथकासह सावकार मळा, खोडशी या ठिकाणी पोहोचले.

यावेळी या फासात 9 ते 10 महिने वयाचा बिबट्या पाय अडकून जखमी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर बिबट्याला वराडे रोपवाटिकामध्ये हलविण्यात आले. रोपवाटिकेमध्ये या बिबट्याच्या पायात अडकलेली फास काढण्यात आली. या ठिकाणी डॉ. चंदन सावणे यांनी बिबट्यावर औषध उपचार केले. या घटनेचे गांभीर्य ओळखून वन कर्मचाऱ्यांनी खोडशी गावच्या परिसरात या गुन्ह्याबाबत कसून चौकशी केली. यावेळी आरोपीचा माग काढण्यासाठी वन्यजीव विभाग कराड यांचे डॉग स्कॉड पाचारण करण्यात आले होते. संशयिताला राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले.