कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील तांबवे गावातील शिवारात दुपारी बाराच्या सुमारास बिबट्याचा मुक्त वावर पाहायला मिळाला. एका जनावरांच्या शेडमधून आत डोकावत असतानाच शेतकर्याला हा बिबट्या दिसला. यामुळे शेतकर्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर वन कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
तांबवे गावातील आप्पासाो पाटील हा शेतकरी सकाळी सातच्या सुमारास जनावरांच्या शेडमध्ये होता. यानंतर काही वेळाने याच शेडमध्ये जवळच बिबट्या डोकावत असल्याचे त्यांनी पाहिले. आप्पासाो पाटील यांनी आरडाओरडा केला. त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने बिबट्याने शेडाच्या पाठीमागील असलेल्या उसाच्या शेतात धूम ठोकली. आप्पासाो पाटील यांनी मोबाईल कॅमेर्यात बिबट्याचे चित्रीकरण केले आहे.
तांबवे परिसरात चार बिबट्यांचा वावर आहे. मागील आठवड्यात तीन ठिकाणी शेतकर्यांना बिबट्यांचे दर्शन झाले आहे. वनविभागाने बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, शिवारात पिंजरा लावावा, अशी मागणी तांबवे ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली. परंतु, एखाद्या नागरीकावर हल्ला केल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही, असे वनविभागाच्या कर्मचार्यांकडून सांगण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे तांबवे ग्रामस्थ संतापले आहेत. बिबट्याने एखाद्याचा बळी घेतल्यानंतरच वनविभागाला जाग येणार आहे का, असा सवालही तांबवे ग्रामस्थ करीत आहेत.