पाटण | चाफळ विभागात कोचरेवाडी, माथनेवाडी आणि खराडवाडी येथे गेल्या काही दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. येथील 5 शेतकऱ्यांच्या शेळ्यावर हल्ला करत ठार केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे चाफळ विभागात बिबट्याच्या दहशतीचे वातावरण असून वनविभागने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांच्यातून होवू लागली आहे.
चाफळ विभागात मंगळवारी बिबट्याने शेळीवर हल्ला केला. यामध्ये कोचरेवाडी-चाफळ येथील नीलेश गुलगे यांच्या शेळीवर निनाईदेवी मंदिराजवळील माथनेवाडी नावाच्या शिवारात भरदिवसा बिबट्याने हल्ला करून ठार केले. तर खराडवाडी येथील किसन निवृत्ती खराडे यांची शेळी मंगळवारी रात्री छपरातून डोंगराकडे ओढत नेत तिचा फडशा पाडला, तर मागील दहा दिवसांपूर्वी दादासो कृष्णत खराडे, सुनील खराडे, तानाजी पाटील यांच्याही शेळीचा बिबट्याने फडशा पाडला. गेल्या आठवड्यात धायटी येथे बिबट्याने प्रवीण विजय देशमुख यांच्या शेळीचा फडशा पाडला होता. धायटी परिसरानंतर आता हा बिबट्या खराडवाडी, कोचरेवाडी गावाकडे सरकला असल्याने व थेट भरदिवसाही पाळीव जनावरांवर हल्ले करू लागला आहे.
बिबट्याचे हल्ले वाढलेले असताना वनविभाग कोणतीच उपाययोजना करताना दिसत नाही. त्यामुळे ग्रामस्थांत संताप आहे. बिबट्याने शेळी फस्त केल्यानंतर फक्त पंचनामे करण्यावर अधिकारी कर्मचाऱ्यांचा जोर वाढल्याचे चित्र आहे. मंगळवारी माथनेवाडी नावाच्या शिवारात येथील जनावरे चरण्यासाठी सोडण्यात आली होती. येथेच झाडीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका शेळीवर हल्ला करून तिला ठार केले. गुराख्यांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या शेळी घेऊन पळून गेला. दरम्यान, रात्री परत खराडवाडी परिसरात किसन खराडे यांच्या शेडमध्ये बिबट्याने शेळीवर हल्ला चढवून डोंगराकडे नेत ठार केले.