तुळसण येथे बिबट्या दुचाकीच्या आडवा : चालक जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील तुळसण येथे शुक्रवारी (दि.4) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्या दुचाकी चालकाच्या समोर आल्याची घटना घडली. यामध्ये दुचाकी चालक जखमीही झाला आहे. यावेळी दुचाकी चालक गाडीवरून खाली पडला असता, बिबट्यानेही भीतीने धूम ठोकली. या घटनेत नागनाथ भोमाजी गंडे असे जखमी झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, तुळसण येथे ऊसतोड मजूर दुचाकीवरून निघालेला होता. यावेळी रस्त्यावर मध्येच बिबट्या आला, तेव्हा दुचाकी चालकांचा गाडीवरील ताबा सुटला. चालक गाडीसह एका नाल्यात जावून पडला, यावेळी बिबट्याही गाडीसोबत नाल्यात गेला. परंतु यावेळी बिबट्याने भीतीने घटनास्थळावरून धूम ठोकली. या घटनेत दुचाकी चालकाच्या पायाला जखमीही झाली आहे.

जखमी ऊसतोड मजूराला उंडाळे येथील प्राथमिक आरोग्य केद्रात उपचारासाठी नेण्यात आले होते. तेथे वनअधिकारी तुषार नवले व कोळेचे वनपाल बाबुराव कदम, म्हासोली वनरक्षक सुभाष गुरव,कासारशिरंबे वनरक्षक सचिन खंडागळे, वनसेवक हणमंत कोळी, वैभव शेवाळे, तानाजी कोळी आदी उपस्थित होते. वनविभागाने जखमी मजूरासोबत घटनास्थळाची पाहणी केली. तसेच घडलेल्या घटनेची माहिती घेतली. तुळसण येथे असलेल्या ऊसतोड मजूराच्या कुटुंबाना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. गावातील ग्रामस्थ व शेतकरी यांनीही बिबट्या असल्याने सावधानता बाळगावी, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार नवले यांनी केले आहे.