‘जे करायचं ते वेळेवर करू’; शहराच्या नामांतरावर किरीन रिजिजूंचे सांकेतिक वक्तव्य

औरंगाबाद – मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या अतिरिक्त इमारतीचा उद्घाटन सोहळा शनिवारी औरंगाबादेत पार पडला. मात्र या दिवशी शहरात औरंगाबाचे संभाजीनगर हे नाव करण्यावरून झालेल्या वक्तव्यांचीच चर्चा जोरदार झाली. शासनाच्या एका पत्रकात संभाजीनगर छापून आल्याने खासदार इम्तियाज जलील चांगलेच भडकले. कोर्टाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले केंद्रीय विधी व न्यायमंत्री किरीन रिजिजू यांनी मात्र वेगळेच संकेत दिले. औरंगाबादच्या नामांतराबाबत जे काय करायचंय, ते वेळेवर करुच, असे सांकेतिक वक्तव्य करून त्यांनी अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला.

औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतरण करण्याच्या वादाविषयी प्रतिक्रिया विचारली असता केंद्रीय विधी व न्यायमंत्री किरीन रिजिजू म्हणाले, “आता सध्या तरी मी या विषयावर काहीही बोलणार नाही. पण जे काही करायचं ते वेळेवर करू..” रिजिजू यांच्या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. किरीन रिजिजू यांनी अप्रत्यक्षरित्या नामांतराचे संकेत दिल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

संभाजीनगर हा अजेंडा आहे आणि राहील- खैरे
दरम्यान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही या वादात प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीनगर हा शिवसेनेचे गेल्या अनेक वर्षांपासून अजेंडा आहे आणि भविष्यातही तो राहील. सामान्य नागरिकांनीदेखील संभाजीनगर हे नाव स्वीकारलेले आहे. जिल्ह्याचे नामकरण करणे ही तर जनभावना आहे. आम्ही जनभावनेसोबत राहू, जनभावनेचा आदर सर्वांनीच करायला हवा, असे वक्तव्य खैरे यांनी केले आहे.

You might also like