कोरोना संकटात शिक्षकांच्या अडचणी दूर करण्यासाठी शिक्षणमंत्र्यांना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी | कोरोना संकटाच्या काळात विविध समाजघटकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. श्रमिक, कष्टकरी, शेतकरी वर्गाचा त्रास दिसून येतो आणि त्यावर बोललही जातं. मात्र अध्यापन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांना त्यांच्या संघटनेतर्फेच आपले प्रश्न मांडावे लागतात. राज्यातील शिक्षकांना कोरोना काळात कराव्या लागणाऱ्या ड्युटी संदर्भात आणि त्यांच्या सुरक्षेसंदर्भात एमफुक्टो या शिक्षक संघटनेत उपाध्यक्ष पदावर कार्यरत असणाऱ्या शिक्षकांनी पत्र लिहिलं आहे. आपल्या मागण्या त्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यापुढे मांडल्या आहेत.

प्रति
मा. वर्षाताई गायकवाड,
शालेय शिक्षण मंत्री
महाराष्ट्र शासन,
मुंबई.

विषय: कोरोना ड्युटीवरील शिक्षकांच्या अडचणी दूर करणेबाबत…

महोदया,
कोरोना साथीत राज्यातील विविध जिल्ह्यांत शिक्षकांना ड्युटी देण्यात आली आहे. परंतु त्या ससंदर्भात अनेक गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात असूनही शिक्षक काम करीत आहेत. असे काम करताना शिक्षकाना कोरोनाची लागण होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामळे वरिष्ट प्रशासनाने शिक्षकांच्या अडचणीकडे तातडीने लक्ष देण्याची व त्या दूर करण्याची गरज आहे.

ला. ना. सार्वजनिक विद्यालय, जळगावचे शिक्षक एस.एच.कोळी यांना रेशनिंग दुकानावर ड्युटी करत असताना कोरोनाची लागण होऊन त्यांचे दु:खद निधन झाले आहे. कोरोनाच्या ड्युटीवर असलेल्या सांगलीचे प्राथमिक शिक्षक नानासो कोरे यांनाही आपले कर्तव्य बजावत असताना सिमेंटने भरलेल्या ट्रकने उडवले. अशा प्रकारच्या गंभीर घटना घडत आहे, तसेच शिक्षकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तरी या संदर्भात खालील मागण्याची पुर्तता करण्यासाठी तातडीने योग्य ती कार्यवाही करावी ही नम्र विनंती.

  1. ड्युटीवर असलेल्या शिक्षकांवर केली जाणारी मनमानी त्वरित थांबवा.
  2. शिक्षकांना सदर काम करण्यासंबंधी लेखी पत्र द्यावे. त्यांमध्ये कामाचे स्वरूप, सर्वांना कामाचे समान तास आणि कोणते अधिकार आहेत ते स्पष्ट केले पाहिजे.
  3. कोरोना ड्युटीवरील सर्व शिक्षकांना सुरक्षितता कीट देण्यात यावे.
  4. सदर शिक्षकांना आपले काम करण्यासाठी कामाच्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधांंची (बैठक व्ययवस्था, सावली, पाणी) पुर्तता करण्यात यावी.
  5. प्रत्येक चेक पोस्टवर शिक्षकांसोबत किमान एक पोलीस कर्मचारी असलाच पाहिजे.
  6. सदर शिक्षकांना विमा संरक्षण द्यावे.
  7. कोरोना साथीत ड्युटी बजावत असताना मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई राज्य सरकारने द्यावी.
  8. शिक्षकांना केलेल्या कामाचे प्रमाणपत्र द्यावे.

आपला नम्र,
प्रा. डाॅ सुभाष जाधव (कोल्हापूर)
राज्य उपाध्यक्ष, एमफुक्टो (महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ)

Leave a Comment