कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
राजमाची (ता. कराड) येथिल सूर्यकांत पाटील यांच्या शिवारात रात्रीच्या अंधारात रान डुक्कर विहिरीत पडले. सकाळी शेतकरी शेतात खत घालण्यासाठी गेले असता, त्यांना विहिरीच्या पाण्यात काही तरी पडले असल्याचे लक्षात आले. त्यांनी विहीरीत वाकून पाहिले असता रानडुक्कर असल्याचे दिसून आले.
विहिरीत एक भले मोठे रानडुक्कर एका काठाला पाण्यात आधार घेऊन बसले होते. बिन बांधीव विहीर व पंधरा फूट खोल असल्याने डुक्करला बाहेर येणे शक्य नव्हते. सुर्यकांत पाटील यांनी तात्काळ वन विभागास कळविले. वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल आनंद जगताप, वनरक्षक उत्तम पांढरे हे तात्काळ पिंजरा व जाळ्या घेऊन घटनास्थळी दाखल झाले. वाघर / जाळी विहिरीत सोडून सदर रान डुकरं यशस्वी पणे बाहेर काढले.
सदरील डुकरं हे नर जातीचे साधारण 60 किलो वजनाचे होते. सदर डुक्कर हे सुस्थितीत असल्याची तपासणी खातरजमा करून त्याला त्याच्या सुररक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. वनक्षेत्रपाल तुषार नवले , मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे,वनपाल आनंद जगताप , वनरक्षक तूषार पांढरे, वनमजुर हणमंत शिंदे, योगेश बेडेकर, भरत व राजमाचीचे स्थानिक ग्रामस्थ सूर्यकांत पाटील व अथर्व चन्ने यांनी सदर रान डुक्करला जीवदान दिले.