सातारा | फलटण तालुक्यातील साठेफाटा येथे वडिलांचा खून करणाऱ्या मुलास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. स्टोव्हचा पंप सापडत नसल्याने मुलाने वडिलास फरशीच्या तुकड्याने 30 मे 2018 रोजी हल्ला केला होता. या प्रकरणात न्यायालयाने मुलगा शामसुंदर नारायण इंगळे (वय ४६, रा.साठेफाटा) याला शिक्षा सुनावली आहे. तर नारायण भिकू इंगळे (वय- 70) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे.
या खटल्याची माहिती अशी, मुलगा शामसुंदर याने 30 मे 2018 रोजी रात्री साडेनऊ वाजता वडील नारायण इंगळे यांच्यासोबत स्टोव्हचा पंप सापडत नसल्याने वाद घातला. हा वाद एवढा विकोपाला गेला की संतप्त झालेल्या मुलाने वडिलांवर फरशीच्या तुकड्याने हल्ला चढवला. त्यांच्या डोक्यावर, कपाळावर व कानावर फरशीचा वर्मी घावबसल्याने नारायण इंगळे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत नारायण इंगळे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास फलटण ग्रामीणचे फौजदार आर. आर. भोळ यांनी करुन जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सरकार पक्षाच्यावतीने अॅड. मिलिंद ओक यांनी युक्तिवाद करत सहा साक्षीदार तपासले. सरकार पक्षाचा युक्तिवाद व सुनावणीदरम्यान आलेले पुरावे ग्राह्य मानून न्यायाधिशांनीआरोपी शामसुंदर इंगळे याला जन्मठेप व पाच हजार रुपये दंड व दंड न दिल्यास सहा महिने साधी कैद, अशी शिक्षा सुनावली. प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, हवालदार उर्मिला घार्गे, शमशुद्दीन शेख, सुधीर खुडे, अश्विनी घोरपडे, अमित भरते, गजानन फरांदे, रिहाना शेख, राजेंद्र कुंभार यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.