मुंबई – एकीकडे महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न ऐरणीवर आला असतानाच दुसरीकडे देलगूर येथील काही गावांनी तेलंगणा राज्यात जाण्याचा विचार सुरु केला आहे. त्यामुळे बेळगाव सीमावाद ठरावाप्रमाणे मराठवाडयातील देलगुरमधील प्रश्न सोडवण्यासाठी या हिवाळी अधिवेशनात चर्चा करायला हवी, अशी मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कामकाज सल्लागार समिती बैठकीत केली.
मराठवाड्यातील देलगुरमधील नागरिक तेलंगणात जाण्याची मागणी करत आहेत. त्या नागरिकांच्या वीज व पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा व्हायला हवी, असे दानवे यांनी म्हटले. विरोधी पक्षनेत्यांची मागणी विचारात घेऊन अधिवेशनकाळात नागपूर येथे प्रश्न उपस्थित करण्याचे यावेळी मान्यवरांकडून सुचवण्यात आले.
मराठवाडा मुक्ती संग्रामाचा यंदा अमृतमहोत्सवी वर्ष आहे. ज्याप्रमाणे केंद्राने तेलंगणात सांस्कृतिक कार्यक्रम केले, त्याच धर्तीवर मराठवाड्यात कार्यक्रम घेण्यात यावे अशी मागणीही दानवे यांनी केली. त्यावर आपल्या राज्यातही केंद्राकडून सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. या बैठकीला उपसभापती निलमताई गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, शेकापचे नेते व आमदार जयंत पाटील, शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील, परिषद सदस्य विलास पोतनीस आदी मान्यवर उपस्थित होते.