परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी केलेल्या व नौकरीस इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ऑनलाईन लिंक करावे. असे आवाहन परभणीचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.
नौकरीसाठी सेवायोजन कार्यालयाकडे नांव नोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांना सर्व सेवा, सुविधा www.mahaswayam.gov.in या ऑनलाईन पध्दतीने संकेतस्थळाच्या माध्यमातुन देण्यात येत आहेत. राज्यभरातील वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध रोजगार मेळाव्यांची सर्व माहिती मिळविणे व त्यासाठी इच्छुकता व पसंतीक्रम नोंदविणे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणुन सहभाग मिळविणे, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची माहिती प्राप्त करणे व सहभाग घेणे, आपली शैक्षणिक पात्रता वाढ करणे , पत्ता , संपर्क क्रमांक, ई-मेल यामध्ये दुरुस्ती करणे, वेगवेगळया उद्योजकांनी वेळोवेळी अधिसुचीत केलेली रिक्त पदांची माहिती मिळवुन त्यासाठी उमेदवारांचा अर्ज सादर करणे अधिकबाबींचा त्यात समावेश करण्यात आलेला आहे.
उद्योजकांच्या मागणीनुसार उमेदवारांचा याद्यामध्ये समावेश होण्यासाठी नोंदणीस आधार लिंक असणे आवश्यक आहे. अनेक बाबींचा लाभ मिळविण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने नोंदणीस आधारकार्ड जोडणी करणे गरजेचे आहे. असेही सहाय्यक आयुक्त , कौशल्य विकास , रोजगार व उदयोजकता , मार्गदर्शन केंद्र , परभणी यांनी कळविले आहे.