सांगली | तासगाव तालुक्यातील सावळज येथे एका तरुणाकडून गावठी बनावटीचे पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जयहिंद चौक येथे सापळा रचून कारवाई केली. या प्रकरणी प्रवीण भीमराव साळुंखे या तरुणास अटक केली आहे.
अटक केलेल्या तरूणांकडून ५० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्टल आणि ४ हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे असा एकूण ५४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील अनिल कोळेकर, सागर टिगरे यांना माहिती मिळाली की, डोंगरसोनीतील प्रविण साळुंखे हा सावळज ते अंजनी जाणाऱ्या रोडला जयहिंद चौकात थांबलेला आहे. त्याच्या कमरेस देशी बनावटीचे पिस्टल आहे. मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी सावळज ते अंजनीकडे जाणाऱ्या रोडला जयहिंद चौक येथे छापा टाकून साळुंखे यास पकडले.
पोलीस उपनिरीक्षक दिलीप ढेरे यांनी त्याची अंगझडती घेतली असता. त्याच्या कमरेस एक गावठी बनावटीचे पिस्टल मैग्झिनसह व पॅन्टच्या खिशात जिवंत काडतुसे मिळाली. त्याच्याकडून एकुन ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला. सदरचा मुद्देमाल सविस्तर पंचनाम्याने पोलीस उपनिरीक्षक दिलीप ढेरे यांनी जप्त केला.




