मुंबई । लॉकडाऊनमुळे गेल्या २ महिन्यापासून बंद असलेल्या सलूनची शटर आता खुली होणार आहेत. राज्य शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन 4.0 नव्या नियामावलीत बिगर रेड झोनमधील सलून सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे गेल्या २ महिन्यांपासून दाढी-केस काढून ऋषी मुनींचा अवतार घेतलेल्या पुरुष मंडळींच्या केसांना आता कात्री लागणार आहे. मात्र सलून सुरु केल्यानंतर मास्क, हँड सॅनिटायझरबाबतचे नियम आणि कोरोना संदर्भातील अटी-शर्थींचे पालन करणे सलून चालकांना बंधनकारक असणार आहे.
राज्यात लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यातही ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सलून सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र स्थानिक प्रशासनाने तेथील कोरोनाच्या संसर्ग परिस्थितीनुसार निर्णय घेतल्याने अनेक ठिकाणी सलून बंदच होते. लॉकडाऊनमुळे गेल्या २ महिन्यापासून सलून बंद असल्याने सलून व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला होता. अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. काही संघटनानी अटी-शर्थींसह सलून उघडण्याची परवानगी मिळावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती देखील केली होती.
दरम्यान, आता बिगर रेड झोनमधील सलून सुरु झाल्याने तेथील नागरिकांना वाढलेल्या दाढी-केस यांच्यापासून सुटका मिळणार आहे. सलूनमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे कठीण आहे. त्यामुळे सलून जरी सुरु झाले तरी कोरोनाच्या भीतीपोटी नागरिक दाढी-केस कापण्यासाठी सलूनमध्ये जाणार का? हा मोठा प्रश्न आहे. सलून बंद असल्याने सर्वसामन्यांपासून नेते मंडळी, सेलिब्रिटी सर्वांच्याच दाढी, केस वाढल्याचं दिसून येत होतं. सोशल मीडियावर अनेकांनी घरीच दाढी, केस कापल्याचे व्हिडीओ देखील शेअर केले होते, तर काहींना दाढी केस वाढलेला नवा लूक सोशल मीडियावर शेअर केला होता, यामध्ये सेलब्रिटी, नेते मंडळी यांचाही समावेश होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”