नवी दिल्ली । लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी केंद्राकडून नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. यानुसार, ई-कॉमर्स कंपन्यांना सेवा पुरवण्यासाठी केंद्र सरकारकडून बरीच मोकळीक देण्यात आली आहे. नव्या निर्देशानुसार, ई-कॉमर्स कंपन्यांना अत्यावश्यक वस्तूंसहीत इतर वस्तूंच्या सामानाची डिलिव्हरी करण्यास सूट मिळाली आहे. ग्रीन, ऑरेंजसहीत ई-कॉमर्स कंपन्या रेड झोनमध्येही वस्तू पोहचवू शकणार आहेत. केवळ कन्टेन्मेंट झोनमध्ये ई कॉमर्स कंपन्यांना पोहचता येणार नाही.
तसंच । लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात प्रवाशांना कन्टेन्मेंट झोन वगळून आता प्रवासासाठी बाईक, बस, टॅक्सी आणि ऑटोचीही मदत घेता येणार आहे. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या गाईडलाईन्सनुसार, खासगी गाड्यांनी परवानगी घेणं आवश्यक राहील. ऑटो, टॅक्सी, बस चालू शकतील. पण त्यासाठीही नियम लागू करण्यात आलेत. या गाड्यांतून किती प्रवाशांनी प्रवास करावा, त्याची संख्या निश्चित करण्यात आली आहे.
त्यानुसार कन्टेन्मेंट झोन वगळून ऑटो-टॅक्सीने ग्रीन, ऑरेंज, रेड झोनमध्ये १+१ प्रवासी वाहतुकीला परवानगी आहे. तर कारने तिन्ही झोनमध्ये १+२ प्रवासी वाहतुकीला परवानगी आहे. बाईक, स्कुटरने प्रवास करत असला तर ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये १+१ तर रेड झोनमध्ये केवळ एका व्यक्तीला प्रवास करता येणार आहे. कार, बाईक आणि स्कुटरने केटेन्मेंट झोनमध्ये प्रवास करण्याला पूर्णतः बंदी आहे. दरम्यान, सार्वजनिक बसचा निर्णय राज्यांवर सोपवण्यात आला आहे. इतर राज्यांत बस चालवण्यासाठी एकमेकांशी चर्चा करून आंतरराज्यीय बस सेवा सुरू केल्या जाऊ शकतील, असंही केंद्रानं स्पष्ट केलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”