कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
राज्यात “ब्रेक द चेन’ या मोहिमेखाली कडक निर्बंध लागू झाले आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार शनिवार व रविवार लॉकाडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, सोमवारी रात्री अचानक जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्यासाठी ‘कडक निर्बंधा’चा आदेश काढला आहे. मार्च एंडचे सर्व थकीत कर भरून, बँकेचे हप्ते भरून, नागरिक मेटाकुटीला आलेले असताना बंदचा निर्णय म्हणजे निष्ठूरतेचेच द्योतक आहे. संकुचित वृत्तीने हा निर्णय घेतला असल्याची आम्हा तमाम व्यापाऱ्यांची भावना आहे. अशात पुन्हा सरकाराने लाॅकाडऊन जाहीर करुन जखमेवर मीठ चाेळण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा असे असंवेदनशील निर्णय घेऊन व्यापारी वर्गास मारण्यापेक्षा एक तर गोळ्या घालून ठार मारा किंवा इच्छा मरणाची परवानगी तरी द्या, अशी मागणी कराड येथील दक्ष कराडकर ग्रुपने केली आहे.
दक्ष कराडकर ग्रुपने मेलवरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार रोहित पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन दिलेले आहे. निवेदनात असे म्हटले आहे की, राज्य सरकारने कोरोना प्रादुर्भाव वाढीमुळे नुकताच आदेश पारित करून सामान्य नागरिक, हातागाडे धारक, किरकोळ विक्रेते, किरकोळ दुकानदार व व्यापारी वर्ग हॉटेल व्यवसायिकांवर बंदीची लादली. पुढच्या काळात लग्न सराई आहे. मात्र या बंदीने नागरिकांची गैरसाेय हाेणार आहे. डबघाईला गेलेली अर्थव्यवस्था पूर्ववत व्हावी, यासाठी आम्ही दुकानं सुरु केली आहेत. काेराेना हा केवळ व्यापा-यांमुळेच हाेताे हा समज सरकारचा झाला आहे का ?
सरकारने शनिवारी आणि रविवारी केलेला लाॅकडाऊन आम्ही मान्य केला. त्याबाबत सरकारला पाठींबा आहे व राहील. परंतु पुढचे सलग २५ दिवस दुकान बंद ठेवणे, आम्हांला मान्य नाही. तो निर्णय आम्हाला उध्वस्त करणारा ठरेल. त्यामुळे निर्णय अन्यायकारक आहे. आगामी काळात सण आहेत. व्यापा-यांना फसवून निर्णय झाला आहे. बांधकाम सुरु ठेवा असे म्हणणा-या सरकारने त्याला लागणाऱ्या साहित्याची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. हा कुठला न्याय आहे. शासनाने, किरकोळ घाऊक विक्रेते, कापड व्यवसायिक, व्यापारी वर्ग, स्टेशनरी साहित्य विक्री, रेस्टॉरंट, हातगाडे, केटरींग यावर बंदी करून आधीच वर्षभर नुकसानीत असणाऱ्या उद्योगांसाठी सरकारकडून कसली सहानुभूती मिळालेली नाही उलट हे उद्योग बंद करून अजून संकटात टाकले आहे. अशात पुन्हा सरकाराने लाॅकाडऊन जाहीर करुन जखमेवर मीठ चाेळण्याचा प्रयत्न केला आहे.
निर्णय घेताना आपण गरीबांचे काय हाल होत असतील याची कल्पना करावी. आपणास गरिबी काय असते नुकसान काय असते हे माहिती नाही. असे असंवेदनशील निर्णय घेऊन व्यापारी वर्गास मारण्यापेक्षा एक तर गोळ्या घालून ठार मारा किंवा इच्छा मरणाची परवानगी तरी द्या. आता आम्हांला खरोखर पटलं आपण निवडणुकीत म्हणत होता की हीच ती वेळ….हो खरं आहे. जनतेला मारण्याची हीच ती वेळ.
तेव्हा आपणाकडून खूप अपेक्षा आहेत. इतका कटू निर्णय न घेता सुवर्णमध्य साधणारी उपाययोजना महत्वाची आहे. आपण घेतलेल्या निर्णयाचा पुर्नविचार व्हावा. कराड शहर समस्त नागरिक,व्यापारी वर्ग, व्यवसायिक वर्ग,घाऊक विक्रेते असे निवेदन मेलद्वारे पाठविण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा करणे गरजेचे होते
नागरिकांना केवळ वीकेंड लाॅकडाऊन असणार असे वाटत होते. मात्र काल आलेला आदेश हा पूर्ण लाॅकडाऊनचा असल्याप्रमाणे निघाला आहे. व्यापाऱ्यांना सध्य मार्च एंडमुळे अर्थिक संकटाना सामना करावा लागत आहे. शासकीय यंत्रणेने वैद्यकीय यंत्रणा ठेवणे गरजेेचे होते. जिल्हाधिकारी यांनी व्यापाऱ्यांना विचारात घेवून निर्णय घेणे अपेक्षित होते, असे दक्ष कराडकर ग्रुपचे सदस्य प्रमोद पाटील यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा