Lok Sabha Election 2024 : यंदाची लोकसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. त्यादृष्टीने देशातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून याच पार्श्वभूमीवर भाजपकडून आज आणि उद्या म्हणजेच १७ आणि १८ फेब्रुवारीला राष्ट्रीय अधिवेशन आहे. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे हे विशेष अधिवेशन पार पडणार असून यावेळी लोकसभेच्या दृष्टीने विशेष रणनीती पक्षाकडून आखण्यात येईल. या अधिवेशनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासहित देशभरातील 11,500 प्रतिनिधी उपस्थित राहतील.
शनिवारी सकाळी 10 वाजता पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा दुपारी ३ वाजता ध्वजारोहण करून या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन करतील. जेपी नड्डा उद्घाटनपर भाषण करतील आणि दुसऱ्या दिवशी मोदींच्या भाषणाने सभेचा समारोप होईल. भाजपच्या या बैठकीत दोन प्रस्ताव आणले जाणार आहेत. यासोबतच राम मंदिर, महिला आरक्षण, शेतकरी आणि तरुणांसाठीची कामे यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी सर्व मान्यवरांना मार्गदर्शन करतील आणि विकसित भारतासाठी नेमकं काय करायला हवं याची ब्लु प्रिंट सुद्धा यावेळी मांडण्यात येईल.
अबकी बार ४०० पार – Lok Sabha Election 2024
लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) भाजपचे मिशन ४०० प्लॅन आखला आहे. कोणत्याही परिस्थिती नरेंद्र मोदी याना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. लोकसभा निवडणुकीसाठी एकूण जागांपैकी भाजपकडून एकट्याने ३७० जागा आणि एनडीएसाठी 400 हून अधिक जागा मिळवण्याचे ध्येय आहे. त्यासाठीची व्युव्हरचना या अधिवेशनात आखली जाईल.
कोण कोण उपस्थित राहणार ?
भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व केंद्रीय मंत्री, भाजपचे सर्व राष्ट्रीय पदाधिकारी, भाजपशासित राज्यांचे सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, सर्व खासदार आणि आमदार, सर्व राज्याचे सर्व मंत्री उपस्थित होते. एवढच नव्हे तर देशातील भाजपचे सर्व जिल्हा पंचायत सदस्य, महानगरपालिकेचे सर्व सदस्य, अध्यक्ष व सर्व जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस व विभागीय अध्यक्ष सहभागी होणार आहेत.