हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उदयनराजे भोसले, रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि पंकजा मुंडे.. कुणी कितीबी ताकद लावली तरी भाजपचे हे तीन उमेदवार विरोधकांना पाणी पाजून खासदार होणारच, असा सगळ्यांनाच विश्वास होता. पण निवडणुकीच्या तोंडावर वारं फिरलं आणि तुतारीचा जोर वाढू लागला. भाजपनं संपूर्ण ताकद लावून दिग्गजांना लोकसभेच्या मैदानात उतरवलेलं असतानाही सातारा, माढा आणि बीडची जागा धोक्यात का आलीये? सगळीकडूनच तुतारी वाजेल अशी चर्चा सुरू असताना भाजपचे हे खमके उमेदवार अजूनही थाटात निवडून येतील, याचे काही चान्सेस आहेत का? शरद पवारांमुळे भाजपच्या प्लॅनिंग गंडलंय का? त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा…
राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडल्यामुळे महाराष्ट्रात लोकसभेला भाजप प्लसमध्ये राहणार असा सगळ्यांनाच विश्वास होता. याच विश्वासातून पश्चिम महाराष्ट्रातल्या दोन आणि मराठवाड्यातल्या एका हक्काच्या जागेवर भाजपने उमेदवार दिले. काही झालं तरी या तिन्ही बालेकिल्ल्यात गुलाल आपलाच! असं सांगायला सुरूवातही केली. पण हीच भाजपची मोठी चूक झाली. सुरुवात करूया ती माढा लोकसभा मतदारसंघापासून….. (Madha Lok Sabha 2024) माढा शरद पवार पाडा असं म्हणत 2019 ला भाजपने माढ्यातून रणजितसिंह निंबाळकरांना निवडून आणलं. मतदारसंघात भाजपचे आमदारही वाढले. त्यामुळे माढ्यात आपण आरामात निवडून येऊ असा भाजपला आत्मविश्वास होता. त्यामुळे इथल्या स्थानिक राजकारणाकडे काना डोळा करत भाजपने रणजीतसिंह निंबाळकरांनाच उमेदवारी रिपीट केली. यावेळेस मोहिते पाटलांच्या नाराजीला भाजप हायकमांडने भिकही घातली नाही. माढ्यात मोहिते पाटलांचा नाही तर आपल्या पक्षाचा शब्द चालतो, असा भाजपचा भ्रम होता. निंबाळकर माढ्यातून लोकसभेची दुसरी टर्म पूर्ण करतील असं वातावरण तयार झालेलं असताना इथल्या शरद पवारांच्या एंट्रीने इथलं समीकरण बदलून गेलं.
नाराज धैर्यशील मोहिते पाटलांच्या हातात तुतारी देत त्यांनी भाजप समोर नवं आव्हान उभं केलं. उत्तमराव जानकर यांना सोबत घेऊन धनगर समाजाचा मिळवलेला पाठिंबा असो, किंवा रामराजेंच्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे फलटणमधून मिळविलेला जनाधार उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच तुतारीच्या बाजूने होता… शरद पवार आणि आघाडीच्या नेत्यांनी माढ्यात प्रचाराचा धुराळा उडवून दिला. माढ्यात वारं फिरतंय हे लक्षात येताच भाजपने ही सावध पवित्र घेतला. फडणवीसांनी इथं जातीनं लक्ष घातलं. मोदींचीही सभा झाली. पण मतदानानंतर माढ्यातील भाजपची जागा धोक्यातय. अस सरसकट सगळेच बोलू लागलेत…
भाजपचा दुसरा गेम झालाय तो साताऱ्यात.… (Satara Lok Sabha 2024)
पोटनिवडणुकीत चितपट होऊनही भाजपने अगदी शेवटच्या यादीमध्ये उदयनराजेंनाच तिकीट देऊ केलं. राजेंच्या विरोधात साताऱ्यात सुप्त लाट असतानाही महायुतीच्या ताकदीच्या जोरावर आपण लोकसभेचं मैदान मारू, असा भाजपला विश्वास होता. वयोमानाचं कारण देत श्रीनिवास पाटलांनी इथून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवारांनीही मग अगदी मोक्याच्या क्षणी शशिकांत शिंदे नावाच्या मोहऱ्याला लोकसभेच्या मैदानात उतरवलं. राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यामुळे यंदा तेल लावलेल्या पवारांच्या राजकारणाला साताऱ्यात जम बसवता येणार नाही, असा भाजपाचा अंदाज असावा. पण निवडणुका जशास जवळ येऊ लागल्या तशी साताऱ्यातही तुतारीचा जोर वाढू लागला. बारामतीनंतर शरद पवारांना सर्वाधिक प्रेम हे साताऱ्यातूनच मिळतं. त्याची जणू पोचपावतीच प्रचाराच्या काळातही मतदारसंघातून मिळत होती. पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्याची ही जागा काही केल्या मिळवायचीच हे भाजपचं स्वप्न होतं. त्यासाठी त्यांनी उदयनराजेंच्या बाजूने संपूर्ण ताकद लावली. पण प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच शशिकांत शिंदे यांनी साताऱ्याच्या मैदानात आघाडी मारली होती… शरद पवारांची पावसातील सभा आणि त्याने पोटनिवडणुकीचं फिरवलेलं वातावरण याचा अनुभव असल्याने आणि आता त्यात शरद पवारांच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट साताऱ्यात शिंदेंची मोठी ताकद ठरली. माढ्या सोबत भाजपच्या साताऱ्याच्या उमेदवारालाही तुतारीकडून सहज मात मिळेल. असा एकूणच मतदारसंघातील जनतेचा कौल दिसतोय…
भाजपची धोक्यात आलेली सर्वात महत्त्वाची जागा आहे ती बीडची… (Beed Lok Sabha 2024)
गोपीनाथ मुंडे आणि बीड हे जणू एका नाण्याच्या दोन बाजू. मुंडे फॅक्टर शिवाय बीडच्या राजकारणाचं पाणी हालत नाही, असं बोललं जातं. गोपीनाथ मुंडे यांच्या दुर्दैवी निधनानंतरही त्यांच्या पुढच्या पिढीमुळे या जागेवर भाजपचाच दबदबा राहिला. प्रीतम मुंडे यांच्या दोन टर्म पूर्ण झाल्यानंतर भाजपसमोर आव्हान होतं की, पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनाचा… शेवटी प्रीतम मुंडे यांच्याजागी पंकजाताईंना तिकीट सुटलं. आणि 2024 ला मुंडे आणि भाजप फिक्स असा एकूणच बीडमध्ये ट्रेंड दिसला. महाराष्ट्रातील भाजपच्या सर्वात सेफ जागांपैकी बीडची जागा समजली जात होती. त्यातही पंकजा मुंडे यांना तिकीट, भाऊ धनंजय मुंडे सोबतीला असताना भाजप बीडमधून निर्धास्त झाली होती. भाजपसाठी सगळं काही ठरवेल तसं घडत असताना इथून शरद पवारांनी बजरंग बप्पा सोनवणे यांना तिकीट दिलं… आणि बीडची निवडणूकीला मराठा विरुद्ध वंजारी असा जातीय रंग आला. मराठा आणि कुणबी समाज बजरंग बप्पांच्या पाठीशी एकवटल्यामुळे बीडच्या निवडणुकीने अनपेक्षित वळण घेतलं. चौथ्या टप्प्यात पार पडलेल्या बीडच्या मतदानातही बरंच थ्रील बघायला मिळालं. वाढलेला मतदानाचा टक्का आणि बोगस मतदान यामुळे बीडची निवडणूक चर्चेत आली. बजरंग बाप्पांनी याच्या विरोधात आता अपील केलीय. पण न्यायालयाने हस्तक्षेप करायला नकार दिल्याने स्पष्ट निकाल हा 4 जूनलाच समजणार आहे. बीडची निवडणूक अत्यंत घासून झाली असून इथं पंकजाताईंना अनपेक्षित धक्का बसू शकतो.
त्यामुळे मोठ्या आत्मविश्वासाने माढा, सातारा आणि बीड मधून लोकसभेच्या मैदानात उतरलेल्या भाजपचा या तिन्ही ठिकाणी तुतारीकडून गेम होतोय की काय? अशा चर्चेला सध्या पेव फुटलंय? हे झालं आमचं एनालिसिस. तुम्हाला काय वाटतं? भाजपाच्या या तिन्ही जागा धोक्यात आहेत का? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.