हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली हिंसाचारासंबंधी सभागृहात चर्चा करण्याच्या मुद्द्यावरून लोकसभेत अजूनही गदारोळ सुरु आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला सभागृहात विरोधी पक्षांकडून होत असलेला गोंधळ आणि महिला खासदाराशी गैरवर्तनामुळे नाराज असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान मंगळवारी झालेल्या गदारोळानंतर ते काल बुधवारी संसदेत पोहोचले मात्र त्यांनी सभागृहात प्रवेश केला नाही. आज गुरुवारी सलग दुसर्या दिवशीही सुद्धा लोकसभेत सुरु असलेल्या गदारोळावर नाराजी व्यक्त करत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहात पाऊल ठेवले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेतील काही खासदारांनी संसदेचे नियम व कार्यपद्धती न पाळल्याने सभापती बिर्ला नाराज असल्याचे सांगितले आहे.
आज (गुरुवारी) लोकसभेत सलग चौथ्या दिवशी विरोधी पक्षांनी दिल्लीतील हिंसाचारावर चर्चा करण्यासाठी गोंधळ केला. त्यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत लोकसभा तहकूब करण्यात आली. ओम बिर्ला यांच्या जागी बिजू जनता दलाचे नेते बी मेहताब सभापतींची खुर्ची सांभाळताना दिसले.
यावेळी त्यांनी विरोधी पक्षांच्या खासदारांना सभागृह शांततेत चालण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, दिल्लीतील हिंसाचार आणि कोरोना व्हायरस या दोन्ही गोष्टींवर सरकारने चर्चेस परवानगी द्यावी. तसेच काही खासदारांच्या चुकीच्या वागण्यामुळे आणि सभागृहाचे कामकाज चालू न देण्यामुळे लोकसभा अध्यक्ष दु:खी असल्याचे त्यांनी लोकसभेत संगितलं.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.