Tuesday, March 21, 2023

संवेदना जागरच्या माध्यमातून एचआयव्ही जनजागृतीचे प्रभावी काम- जिल्हाधिकारी दौलत देसाई

- Advertisement -

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक आणि किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लि.ने संवेदना जागर 2020 च्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये एचआयव्ही एड्स जनजागृतीचे प्रभावीपणे काम केले आहे. त्या सर्व पथकाचे मी अभिनंदन करतो, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज काढले.

संवेदना जागर 2020 चा सांगता सोहळा आणि किर्लोस्कर सामाजिक बांधिलकी पुरस्कार वितरण येथील शाहू स्मारक सभागृहात आज झाला. या प्रसंगी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आरोग्य सेवेचे उपसंचालक डॉ. हेमंतकुमार बोरसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी.केम्पी पाटील, मराठी चित्रपट अभिनेत्री स्मिता शेवाळे, किर्लोस्कर ऑईल लि.चे प्रकल्प प्रमुख चंद्रहास रानडे, सामाजिक बांधिलकी अधिकारी शरद अजगेकर, एन.एम.पी.चे गौतम ढाले आदी उपस्थित होते.

- Advertisement -

यंदाचा किर्लोस्कर सामाजिक बांधिलकी पुरस्कार शिशुगृह विभाग बाल संकुलला देण्यात आला आणि किर्लोस्कर ऑईल इंजिन्स यांनाही यावेळी गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी देसाई पुढे म्हणाले, राज्यातील अन्य जिल्ह्यांपेक्षा अत्यंत संवेदनशीलपणे एचआयव्ही एड्स जनजागृतीचे काम आपल्या जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे सुरू आहे. एड्स सारख्या गंभीर विषयाचे हे पथक लोककलेच्या माध्यमातून प्रबोधन करत आहे. त्याचबरोबर एलजीबीटीचे कामही उत्तमपणे करत आहेत. यामुळे मी भारावून गेलो आहे. या सर्व पथकाचे मी कौतुक करतो.

महापालिका आयुक्त डॉ.कलशेट्टी म्हणाले, विविध उपक्रमाच्या माध्यमातून एचआयव्ही एड्सबाबत सातत्यपूर्ण जाणीव जागृती व्हावी, यासाठी चांगले काम सुरू आहे. जिल्ह्यामध्ये एचआयव्हीवर नियंत्रण आणण्यासाठी अधिक प्रभावीपणे काम करू. रानडे यावेळी म्हणाले, किर्लोस्करच्या माध्यमातून संवेदना जागर ही आता सामाजिक बांधिलकी न राहता ते ऋणानुबंध कायम झाले आहेत. ही चळवळ भविष्यात वृध्दिंगत होईल.

अभिनेत्री स्मिता शेवाळे म्हणाल्या, मी आज या कार्यक्रमाला येवून भारावून गेले आहे. भविष्यातही अशा सामाजिक कार्यक्रमाला माझा हातभार निश्चितपणे मी लावेन. युवा पिढीने अशा कार्यक्रमामध्ये उर्जा घ्यावी आणि समाजाप्रती संवेदनशीलपणे काम करावे. यावेळी संवेदना जागरचे स्वयंसेवक पर्यावरणपूरक कार्यक्रम करणारे अश्फाक मकानदार, सुनीता मेंगणे, कृष्णा गावडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर यांनी स्वागत प्रास्ताविक केले. शेवटी शरद आजगेकर यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या साधना झाडबुके, सुरेश शिपुरकर यांच्यासह परिचारिका, विद्यार्थी-विद्यार्थीनी, वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी-पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.