ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट सुरूच : तोडणीचा एकरी दर 5 ते 7 हजार

Sugarcane FRP
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुसेसावळी | ऊस गळीप हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आला असून जिल्ह्यासह परजिल्ह्यांतही साखर कारखान्याच्या माध्यमातून उसाचे गाळप सुरू आहे. मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे. उसाची नोंदणी केली असताना कारखान्याचे चिटबॉय सोडून मुकादम स्वतःच उसाचे फड ठरवत आहेत. तर मुकादम एकरी 5 ते 7 हजार रुपयांची मागणी करत आहेत. प्रत्येक वाहनासाठी 300 ते 500 रुपयांचा (इंट्री) दर देऊन ही वरून ड्रायव्हरला जेवणाचा डबा द्यावा लागत असल्यामुळे शेतकऱ्यांची ऊस टोळीकडून लूटच सुरू आहे. इतके पैसे न दिल्यास या टोळ्या ऊस तोडत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव टोळ्यांना पैसे द्यावे लागत आहेत. खटाव तालुक्यातील तीन साखर कारखान्याबरोबर कराड, कोरेगाव, सांगली, कोल्हापूर, कडेगाव आदी भागातील कारखान्यांची तोड असतानाही या परिस्थितीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

यावर्षी सर्वच कारखान्यांकडे टोळ्यांची संख्या कमी असल्याने कारखानदारांची अडचण झाली आहे. त्यामुळे ऊस तोड मजूर कमी असल्याचा गैरफायदा टोळीचे मुकादम घेत असून प्रत्येक कारखान्याकडे तोडणी यंत्रणा कमी आल्याने आपला ऊस कारखान्यांना वेळेत जाईल का नाही या विवंचनेत शेतकरी आहे. कारखान्यांतील अधिकाऱ्यांनी जरी टोळ्यांना अमूक शेतकऱ्याचा ऊस लागण केल्याची कारखान्यांकडे नोंद असून परिसरातील ऊस तोडायचे निर्देश दिले, तरी टोळी मुकादम जिकडे पैसे जास्त तिकडे ऊस तोड करत असल्यामुळे मुकादमांची मुजोरी वाढत चालली आहे, यावर्षी अवकाळी पावसाच्या परिणामामुळे ऊस उत्पादन कमी निघत आहे. त्यातच उत्पादन खर्च तिप्पट वाढल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे येणाऱ्या ऊस बिलाआधीच त्याच्यावर हे नवीन आर्थिक संकट उभं राहिलं आहे.

त्यामुळे शेतकऱ्याला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. तर आता मार्च महिन्यात टोळ्यांचे दर आणखी वाढत जाण्याची शक्यता आहे. त्यातच कारखान्यांकडून कारवाई होत नसल्याने टोळी मुकादमांची मुजोरी वाढली आहे. त्यामुळे कारखाना व्यवस्थापनाने लक्ष घालून ऊसतोड टोळी मुकादमांवर कारवाई करणे गरजेचे आहे.