हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मुंबईत स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न अनेक मध्यमवर्गीय लोक पाहतात. मात्र, वाढत्या घरांच्या किमतींमुळे हे स्वप्न पूर्ण करणे अनेकांसाठी कठीण होते. अशा परिस्थितीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण (Mhada) परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देत असते. म्हाडाच्या घरांसाठी मोठ्या प्रमाणावर लोकं अर्ज करतात आणि लॉटरी जिंकून आपले घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करतात.
म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाच्या 2264 घरांसाठी लॉटरी जाहीर करण्याची तारीख याआधी 31 जानेवारी 2025 निश्चित करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने ती पुढे ढकलून आता फेब्रुवारी महिन्यात लॉटरी जाहीर होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आतापर्यंत अर्ज भरलेले लोकं लॉटरीची तारीख जाहीर कधी होणार? याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ही तारीख समोर आली आहे.
सध्या या सोडतीत एकूण 2264 घरे उपलब्ध असून, त्यामध्ये विविध गटांसाठी सदनिका आरक्षित आहेत. यात 594 सदनिका, 15 टक्के एकात्मिक गृहनिर्माण योजनेत 825 फ्लॅट्स आणि कोकण मंडळाच्या 728 फ्लॅट्सचा समावेश आहे. या घरासाठी अर्ज केलेल्या लोकांना निकाल एसएमएस आणि ई-मेलद्वारे कळवला जाणार आहे. त्यामुळे या लॉटरीत अनेकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
दरम्यान, म्हाडा दरवर्षी विविध योजनांअंतर्गत घरे उपलब्ध करून देत असते. यावर्षीही 1200 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली आहे. ज्याला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आहे. महत्वाचे म्हणजे, घरांच्या अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आल्यानंतर आता फेब्रुवारी महिन्यात अंतिम लॉटरी सोडत होणार आहे.