सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
माण तालुक्यात काही दिवसांपूर्वी वाळूचोरीला आळा बसला होता. मात्र, मौजे पळशी हद्दीतील वाळूचोर पुन्हा एकदा जोमात आले असून छुप्या पद्धतीने वाळूउपसा करत आहेत. आयएएस प्रशिक्षण कार्यकाळात माणचे तहसीलदार पद भूषवताना वाळूमाफिया तसेच खडी क्रशर धारकांच्या मनात धडकी भरवणाऱ्या कारवाया करणारे रिचर्ड यानथन हे माणमधून जाताच माणमध्ये पुन्हा एकदा वाळूचोरीचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. तहसीलदार सूर्यकांत येवले हे पुन्हा सेवेत रुजू होताच वाळूचोरांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.
माण तालुक्यातील मौजे पळशी हद्दीतील माणगंगा नदीपात्रात वाळू चोर पुन्हा जोमात आले आहेत. सायंकाळी सात वाजल्या की वाळूचोरीला सुरुवात होत असून ट्रॅक्टरच्या साहाय्याने पहाटे पाच ते सहा वाजेपर्यंत वाळू उपसा होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
रिचर्ड यानथन यांच्या धडक कारवाईत जिल्हाधिकारी यांनी वाळूचोरीला आपला पाठिंबा देत त्यांच्याकडून हफ्ते वसूल करत स्वस्वार्थ साधणारे पाच तलाठी निलंबित केले होते. या झालेल्या कारवाईनंतर वाळू माफियांच्या हृदयात धडकी निर्माण झाली होती. पण आता वाळूचोरीचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून आलेला असून ट्रॅक्टरसह रात्री वाळू उपसा करणारे हे नेमकं कुणाच्या जीवावर उड्या मारताहेत, अशी चर्चा लोकांमधून सुरू आहे. तहसीलदार सूर्यकांत येवले पुन्हा माणमध्ये येताच वाळूचोरीला उधाण आल्याचे दिसते.
काही दिवसांपूर्वी झालेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार गोरे यांनी तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यावर वाळूचोरांना पाठिंबा देत असल्याप्रकरणी आरोप केले होते. मात्र त्या आरोपा नंतर काय झालं हेही लोकांना कळलं नाही. त्यांनंतर रिचर्ड यानथन यांच्या धडक कारवाया आणि तहसीलदार येवले यांची माणमधील पुन्हा एकदा झालेली एन्ट्री, त्यातच भर म्हणून वाढलेली वाळूचोरी हे मुद्दे घेऊन लोक आपापसांत चर्चा करत आहेत.
यामुळे माणचे तहसीलदार सूर्यकांत येवले हे वाळूचोरांना पाठीशी घालतात की रिचर्ड यानथन यांच्याप्रमाणे वाळू माफिया अन वाळूचोरांविरोधात काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.