हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भल्या भल्या राजकीय नेत्यांना मोहोळ घालणारा…पाणी पाजणारा…पश्चिम महाराष्ट्रातला एक अटीतटीचा… निंबाळकर, मोहिते पाटील, पवार आणि शिंदे यांच्या आजूबाजूला राजकीय कुरघोड्या चालणारा माढा लोकसभा मतदारसंघ (Madha Lok Sabha 2024) ! कधीकाळी शरद पवारांनी 2009 साली तीन लाखांहून अधिकची लीड घेत माढा राष्ट्रवादीचा भक्कम बालेकिल्ला बनवला. पण काळ पुढे सरकत गेला अगदी तसंच स्थानिक नेत्यांना पाठीशी घेत भाजपनं हा बालेकिल्ला आपल्याकडे खेचून आणला. पण सत्ताधारी भाजप आणि एकूणच माढ्यात इच्छुक उमेदवारांची संख्या वाढल्याने यंदा तिकीट वाटप कुणाला होणार? यावरून बरंचस राजकारण रंगताना दिसणार आहे. महायुतीची मजबूत पकड असली तरी शरद पवार यांचाही या मतदारसंघात जनसंपर्क तगडा आहे. त्यामुळे यंदा माढ्याचा खासदार कोण? माढ्यातील आमदार कोणाला साथ देतील? निंबाळकर आणि मोहिते पाटील या मतदारसंघावर इतकं वर्चस्व कसं गाजवतात? याकडे सर्वांचे लक्ष्य लागलं आहे.
माढा म्हणजे शरद पवारांचा मतदारसंघ. 2009 ला या मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढत पवारांनी भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांचा 3 लाखांहून जास्तच्या लीडने पराभव केला होता. 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सदाभाऊ खोत निवडणुकीच्या रिंगणात होते. चुरशीच्या बनलेल्या या लढतीत मोहिते पाटील यांना 25 हजार मतांनी दिल्लीचे दरवाजे मोकळे झाले. त्यामुळे सलग दोन टर्म या मतदारसंघात राष्ट्रवादीचा दबदबा कायम राहिला. मात्र 2019 उजाडता उजाडता या मतदारसंघाचा पुरता चेहरा मोहरा बदलून गेला होता. विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं या मतदारसंघात भाजपची ताकद वाढली. त्यामुळं 2019 च्या निवडणुकीत मोहिते पाटलांनी भाजपचा उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला आणि निकालही अपेक्षित असाच लागला. राष्ट्रावादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर उभे असलेल्या अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांचा पराभव करत निंबाळकरांनी राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला भाजपकडे खेचून आणला.
माढ्याचं थोडं ग्राउंडवरचं पॉलिटिक्स आता आपण थोडक्यात समजून घेऊयात. 2019 च्या निवडणुकीत मोहिते पाटील यांनी रणजीत सिंह निंबाळकर यांना माळशिरस तालुक्यातून एक लाखांहून अधिकच मताधिक्य दिलं होतं. मोहिते पाटील युतीच्या धर्माला जागले होते. मात्र मधल्या काळात खासदार निंबाळकर यांनी मोहिते पाटलांचे पारंपारिक विरोधक आमदार बबन शिंदे आणि संजय शिंदे यांच्यासोबत हात मिळवणी केली. परिणामी मोहिते पाटील आणि खासदार निंबाळकर यांच्यात दरी निर्माण झाली. आणि धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyashil Mohite Patil) यांनी चक्क खासदारकीवरच दावा ठोकून निंबाळकरांची गोची केली. यात भर म्हणून अजित पवारांनी माढ्यावर दावा करत रामराजे नाईक निंबाळकर यांचं नाव पुढं केलंय. त्यामुळे आता माढ्यातून महायुतीच्या गोटातून तीन तगडे उमेदवार तिकिटासाठी अडून बसणार असं सध्याचं तरी चित्र दिसतंय. त्यामुळे ऐन मोक्यावर बंडखोरी झाली तर त्याचा मोठा फटका भाजपला बसू शकतो हे ही तितकंच खरं!
सध्या धैर्यशील मोहिते पाटील हे गावोगावी दौरे करत आहेत, तर रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी देखील पुन्हा मीच असं म्हणत गाठी भेटी सुरु केल्या आहेत. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील या मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. तर महादेव जानकर सोबत आल्यास आम्ही माढ्याची जागा धनगर समाजाला द्यायला तयार आहोत, अशी भूमिका घेत शरद पवारांनी गुगली टाकून पाहिलीय. त्यामुळे यंदाची निवडणूक मोठी रंगतदार ठरणार अशी चिन्हं आत्तापासूनच दिसू लागली आहेत.
माढा मतदारसंघात (Madha Lok Sabha 2024) सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, करमाळा, सांगोला आणि माढा हे चार विधानसभा मतदारसंघ येतात. तर सातारा जिल्ह्यातील माण-खटाव आणि फलटण हे दोन विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघात येतात. त्यामुळं या मतदारसंघात अटीतटीची लढत होते. ग्रामीण पातळीवरील स्थानिक शेतीमातीचे आणि पाण्याचे प्रश्न या मतदारसंघात नेहमीच कळीचे मुद्दे राहिले आहेत. माण, सांगोला हे परंपरागत दुष्काळी तालुके या मतदारसंघात आहेत. येथे पाणीटंचाई खूप आहे. सिंचनाची कामे होत असली तरी त्याचा वेग कमी आहे. माढा मतदारसंघात साखर कारखानदारी असली तरी ती सध्या आर्थिक अडचणीत आहेत. शिक्षण, आरोग्य सुविधा आणि इतर पायाभूत सुविधांची वानवा असल्याने माढा विकासापासून अद्याप कोसो दूर आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदारांसाठी नक्की उमेदवार कोणती आणि कशी आश्वासन घेऊन येतात हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.
महायुती असली तरी रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) आणि रणजितसिंह निंबाळकर (Ranjit Nimbalkar) यांचे राजकीय वैर सर्वांनाच ठावूक आहे. त्यामुळं रामराजे नाईक निंबाळकर रणजितसिंह निंबाळकर यांचे काम करतील अशी स्थिती नाही. दुसरीकडे मोहिते पाटील यांची माढा लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद असून मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून भाजपाला जिंकता आला होता. मात्र सध्याच्या परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील आमदार बबनदादा शिंदे, करमाळाचे आमदार संजयमामा शिंदे, सांगोल्याचे शिंदे सेनेचे आमदार शहाजीबापू पाटील आणि माण खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी आपले वजन विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांच्या पारड्यात टाकल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजप मोहिते पाटीलांच्या मागे उभं राहतं कि रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या यावरच अनेक गणित ठरणारेत.
सध्याच्या घडीला माढयासाठी अजित पवार गट, भाजप असे दोघेही आग्रही असून भाजपमधून रणजितसिंह निंबाळकर अन मोहिते पाटील या दोघांनीही आपणच उमेदवार असल्याचं दाखवायला सुरु केलय तर दुसरीकडे रामराजे निम्बालकरांनीही माढ्यात रस घेतलाय. शरद पवार गटाला मात्र अद्याप आपला चेहरा निवडता आलेला नाहीये. माळशिरस विधानसभा वगळता सर्व आमदार मोहिते पाटीलांच्या विरोधात असल्यानं काय भुमीका घ्यायची असा प्रश्न भाजपसमोर आहे. रणजितसिंह निंबाळकर यांचे दिल्लीतलं वाढलेलं वजन अन मतदार संघात जनसंपर्क कमी असला तरी लावलेली राजकीय फिल्डिंग हि जमेची बाजू आहे तर मोहिते पाटील यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेले घनिष्ठ संबंध, रामराजे नाईक निंबाळकरांसोबत असलेली मैत्री अन मतदारसंघावर अगदी पूर्वीपासून असलेला होल्ड या जमेच्या बाजू आहेत.
नेहमी शांत, संयमी असणारे मोहिते पाटील पहिल्यांदाच ज्या आक्रमकपणे आपला माढा, आपला खासदार अशी मोहिमी चालवतायत त्यावरून फडणवीसांनी त्यांना काहीतरी शब्द दिल्याचं नाकारता येत नाही. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री असताना तेव्हा शिवरत्न बंगल्यासमोर वेटिंगसाठी बसणारे आत्ताचे आमदार सध्या मोहितेंना विरोध करत असले तरी फडणवीसांचा बॅकअप, रामराजेंची सोबत अन कार्यकर्त्यांचं जून नेटवर्क वापरून मोहिते पाटील पुन्हा आपलं राज्याच्या राजकारणात उभारी घेणार कि रणजितसिंह निंबाळकर शांतीत क्रांती करून मोहिते पाटीलांना दिल्लीच्या मदतीने शह देणार? कि शरद पवार सरप्राईझ उमेदवार देऊन महायुतीतल्या नाराजीचा अचूक फायदा उठवून ढासळलेला बालेकिल्ला डागडुजी करणार हे पहावं लागेल.