हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha 2024) भाजपने खासदार रणजितसिंह निंबाळकर याना पुन्हा एकदा लोकसभेचे तिकीट दिल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyashil Mohite Patil) नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काल त्यांच्या घरी समर्थकांची बैठक सुद्धा पार पडली. विशेष म्हणजे या बैठकीला अजित पवार गटातील रामराजे निंबाळकर, शेकापचे जयंत पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय कोकाटे यांची उपस्थिती होती. त्यामुळे मोहिते पाटील काही वेगळा निर्णय घेणार का? याकडे आगामी काळात लक्ष्य राहील.
रणजितसिंह निंबाळकर (Ranjit Nimbalkar) याना भाजपने लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिल्यानंतर मोहिते पाटील यांचे कार्यकर्ते भाजप विरोधात आक्रमक झाले आहेत. कोणत्या परिस्थितीत आपल्याला लोकसभा लढवायची आहे, आणि वेळ पडली तर शरद पवार (Sharad Pawar) यांची तुतारी हातात घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरू असं मोहिते पाटलांचे समर्थक म्हणत आहेत. त्यामुळे माढ्यात आता वेगळं काय घडणार का? शरद पवार सध्याच्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेत डाव टाकणार का हे बघायला हवं. कारण महाविकास आघाडीत माढ्याची जागा शरद पवार गट लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झालं आहे.
कालच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष संजय कोकाटे म्हणाले, धैर्यशील मोहिते पाटील यांनी खासदार शरद पवार यांच्या पक्षाकडून लढावं. माझी अपेक्षा आहे मोहिते पाटलांनी ‘तुतारी’ हातात घ्यावी. मी शिवसेनेचा राजिनामा दिला आहे. भाजपच्या विरोधातील उमेदवार हा शरद पवार यांच्या पक्षाचा असणार, असंही कोकाटे म्हणाले. तर येत्या दहा ते पंधरा दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात फार मोठे बदल घडतील, असे भाकित शेकापचे जयंत पाटील यांनी केलं. त्यामुळे माढ्यात वेगळं काहीतरी घडणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.