मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भोपाळ । मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लागण झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशमध्ये वाढत्या कोरोना संक्रमणा दरम्यान ही बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी सोशल मीडियाद्वारे नागरिकांना, ”माझी राज्यातील जनतेला विनंती आहे की सावधानता बाळगा, छोटीशी चूकदेखील कोरोनाला आमंत्रण देऊ शकते,” असं सांगत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

शिवराज सिंह चौहान यांनी सोशल मीडियावरून आपणं कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती दिली. त्यांनी लिहिलंय ‘प्रिय देशवासियांनो, मला कोविड १९ ची काही लक्षणं जाणवत होती. त्यामुळे करण्यात आलेल्या टेस्टनंतर माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. माझी सगळ्या सहकाऱ्यांना विनंती आहे की माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली करोना चाचणी करून घ्यावी आणि माझ्या निकटचा संपर्क असणाऱ्या लोकांनी स्वत:ला क्वारंटीन करावं’. ‘मी कोरोना गाईडलाईन्सचं संपूर्ण पालन करतोय. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी स्वत:ला क्वारंटीन करून उपचार घेणार आहे. माझी राज्यातील जनतेला विनंती आहे की सावधानता बाळगा, छोटीशी चूकही करोनाला आमंत्रण देऊ शकते’ असंही शिवराज सिंह यांनी म्हटलं.

आपण २५ मार्चपासून प्रत्येक सायंकाळी करोना संक्रमणाच्या स्थितीचा आढावा घेतच राहू तसंच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करोना समिक्षेचा प्रयत्न करेन, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हणत जनतेला आश्वासित केलं आहे. मध्य प्रदेशातल्या कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेतली तर आत्तापर्यंत राज्यात २६ हजार २१० रुग्ण आढळलेत. यातील ७५५३ जणांवर उपचार यशस्वी ठरलेत. तर अद्याप १७ हजार ८६६ जणांवर उपचार सुरू आहेत. मध्य प्रदेशात एकूण ७९१ जणांनी करोनामुळे प्राण गमावले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment