महाबळेश्वर- पाचगणी पर्यटनासाठी उद्यापासून खुले, मात्र पर्यटकांची कोरोना टेस्ट होणार : प्रातांधिकारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

महाबळेश्‍वर- पाचगणी ही राज्याची पर्यटनस्थळे खूप दिवसांच्या टाळेबंदी नंतर पर्यटकांसाठी उद्या 19 जूनपासून खुली करण्यात येणार आहेत. मात्र येथे येणाऱ्या पर्यटकांची दांडेघर नाक्यावर रॅपिड अ‍ॅन्टीजेन तपासणी करण्यात येणार असल्याची माहीती वाईच्या प्रांताधिकारी संगिता राजापुरकर -चौगुले यांनी दिली. शुक्रवारी महाबळेश्‍वर येथील हिरडा विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत दिली. या वेळी तहसिलदार सुषमा चौधरी पाटील व माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर उपस्थित होते.

साताऱ्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी टाळेबंदीच्या नियमात शिथिलता देऊन काही निर्बंध उठविले आहेत. यानुसार शनिवार (दि.19) सकाळ पासुन महाबळेश्वर व पाचगणी ही दोन्ही पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यात येणार आहेत. टाळेबंदीच्या नियमात कशा प्रकारे शिथीलता देण्यात आली
असल्याची माहीती देण्यासाठी वाईच्या प्रांताधिकारी संगिता राजापुरकर चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली महाबळेश्वर येथील विविध संघटनांचे प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत प्रांताधिकारी यांनी निर्बंध शिथिलते बाबत सविस्तर माहीती दिली. पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना कोरोनाची चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. कोरोना चाचणीचे अहवाल बरोबर घेवुन न येणाऱ्या पर्यटकांची पाचगणी येथील दांडेघर नाक्यावर रॅपिड अ‍ॅन्टीजेन चाचणी घेण्यात येणार आहे. यामध्ये ज्यांचे अहवाल नकारात्मक आले आहेत, अशाच पर्यटकांना पाचगणी व महाबळेश्वर येथे प्रवेश देण्यात येणार आहे. बाजार पेठेतील दुकानदारांची कोरोना टेस्ट बंधनकारक आहे. व्यापारी व हॉटेल मधील कामगार यांची दर दहा दिवसांनी कोरोना तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. कोरोना बाबतचे सर्व नियम हॉटेल व्यवसायिक व व्यापारी यांना बंधनकारक करण्यात आले आहेत.

या बैठकीला गटविकास अधिकारी नारायण घोलप, पाचगणीचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, महाबळेश्वर पालिकेच्या कर निरीक्षक भक्ती जाधव, हॉटेल संघटनेचे अध्यक्ष मनिष तेजाणी, दिलीप जव्हेरी, असिफ सयद, धिरेन नागपाल, योगेश बावळेकर, रोहन कोमटी, अॅड संजय जंगम, सुर्यकांत जाधव, माजी नगरसेवक संतोष शिंदे, व्यापारी प्रतिनिधी अतुल सलागरे नितीन शिंदे, प्रितम शिंदे, केतन यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment