सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सध्या नाताळ आणि विकेंड त्यातच नवीन वर्षाची सुरुवात सलग या सुट्यामुळे पर्यटकांनी मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, तापोळा, मुनावळे, शेबंडी मठ येथील पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे . यावेळी शिवसागर जलाशयातील बोटींग सह वासोटा ट्रेंकीगचा आनंद लुटताना पर्यटक दिसत आहे.
सलग मिळालेल्या सुट्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी गोवा, काश्मीरच काय तर निळ्या आभाळाच्या छताखाली, चोहोबाजूनी हिरव्यागार व घनदाट जंगलाने सजलेल्या डोंगररांगा आणि शिवसागर जलाशयाच्या अथांग जलाशयातील निळशार पाण्याच्या लाटेवर बोटीतुन प्रवास करणे म्हणजे एक वेगळाच आनंद असतो. जलाशयातील बोटींगचा आंनद लुटण्यासाठी , तापोळा, मुनावळे व विनायक नगर मठ येथील बोटींग क्लबवर गर्दी होताना दिसत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन पर्यटन व्यवसाय सुरु झाल्याने आणि त्यातच विकेंडलाच आलेला नाताळ सण आणि नवीन वर्षाची सुरुवात या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांचा कल तापोळा बामणोलीकडे वाढला आहे. यामुळे येथील अडचणीत आलेला व्यवसायिक काहीसा सुखावल्याचे दिसून येत आहे. एक महिन्यापूर्वीच महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा, बामनोलीचे बुकिंग ऑनलाइन झाल्याने सध्या ऑनलाईन ला महाबळेश्वर पाचगणी तापोळा बुकिंग फुल दिसू लागले आहे तरी देखील प्रत्यक्ष पर्यटक या पर्यटन स्थळावर येऊन उपलब्ध असणारे हॉटेल बुकिंग करत आहेत आणि मनमुराद सुट्टीचा आनंद आतापासूनच घेऊ लागले आहेत.