महाबळेश्वरात कोरोनामुळे घोड्यांवर उपासमारीची वेळ, पर्यटक नसल्याने घोडेमालक हवालदिल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाचगणी प्रतिनीधी । जागतिक पर्यटनस्थळ व महाराष्ट्राचे नंदनवन समजल्या जाणार्‍या महाबळेश्वर, पाचगणी येथील घोडेसवारीतील घोड्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना विषाणूमुळे सुरु असलेल्या लाॅकडाउनचा फटका येथील घोड्यांनाही बसला आहे. लाॅकडाऊनमुळे घोड्यांना खाद्य मिळणे मुश्किल झाले असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. माणसासोबत माणसावर अवलंबून असणार्‍या पाळीव प्राण्यांनाही कोरोनाचा फटका बसत असल्याने या मुक्याप्राण्यांकडे शासनाचे कधी लक्ष जाणार असा सवाल स्थानिक घोडे मालकांकडून विचारला जात आहे.

महाराष्ट्राचे नंदनवन व जागतिक पर्यटन स्थळ म्हुणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर व पाचगणीत छत्रपती शिवरायांच्या काळापासुन इंग्रजांच्या काळापर्यंत घोडे सवारीचा मुख्य व्यवसाय केला जातो. या भागातील अनेकजण आपले पोट भरण्यासाठी फार पूर्चीपासून घोडेसवारीचा व्यवसाय करतात. पर्यटकांकडून घोडेसवारीमधून दिवसाला किमान ४०० ते ५०० रुपयांची कमाई होते. यावरच अनेकांच्या घरात चूल पेटते. नगरपालिकेनेही यानुसार नागरिकांना अधिकृत परवाने दिले आहेत. मात्र मागील दोन आठवड्यांपासून कोरोना व्हायरसमुळे पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. पर्यटकच नसल्याने येथील पर्यटनावर गुजरान करणार्‍या गाईड, घोडेसवार यांच्यावर बिकट परिस्थिती ओढवली आहे. यातील अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मार्च, एप्रिल आणि मे या महिण्यांत महाबळेश्वर येथे पर्यटनाला येणाऱ्यांची संख्या मोठी असते. या काही दिवसांत होणार्‍या कमाईवरच अनेकांचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते. मात्र आता नेमक्या याच सिझनवर कोरोनाने घाला घातल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

घोड्याला दर दिवसाला किमान १४ ते १५ किलो कडबाकुट्टी तर ८ ते १० किलो भुसा लागते. मात्र आता लाॅकडाउनमुळे पुरेसे खाद्य मिळत नसल्यामुळे दिवसेंदिवस घोड्यांची अवस्था गंभीर होऊ लागली आहे. यामुळे एकिकडे व्यवसाय बंद असल्याने घरातील वस्तूंवर पैसे खर्च करायचे की घोड्याच्या खाद्यावर पैसे खर्च करायचे असा प्रश्न पडला आहे. महाबळेश्वर व पाचगणीतील ३३४ घोड्याची प्रकृती दिवसेंदिवस खालवु लागली आहे. कोरोनाच्या झळा आता या मुक्या जनावरांनाही सोसाव्या लागत असल्याचे यामुळे समोर आले आहे. तेव्हा शासनाने महाबळेश्वर व पाचगणी येथील घोड्यांना लवकरात लवकर खाद्याची सोय करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे .