व्यक्तीविषेश | संपत मोरे
गेल्या सालच्या मे महिन्यात मी माण तालुक्यात एका स्टोरीच्या निमित्ताने तालुक्यात फिरत असताना मी पळसावडे नावाच्या गावात गेलो, तिथं गेल्यावर गावात राष्ट्रीय समाज पक्षाचा बोर्ड दिसला. मी चौकशी केली तर मला समजलं हे गाव महादेव जानकर यांचं आहे. ‘जानकर साहेबांनी आमच्या सांगली लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुक लढवली होती. तेव्हा त्यांचं भाषण मी पलूसच्या सभेत ऐकलं होतं. त्यांचा भाषणातील विश्वास आणि कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारी भाषाशैली मनाला भावली होती. त्यानंतर जानकर यांच्यावर प्रेम करणारे आमचे एक मित्र निवृत्ती शिंदे यांच्याकडून त्यांच्या त्यागाबद्दल अनेक गोष्टी समजल्या. त्यातील एक गोष्ट म्हणजे ‘जानकर साहेब घरी गेलेले नाहीत. ‘पळसावडे गावात गेल्यावर त्या सगळ्या गोष्टी मला आठवल्या. राज्याच्या राजकारणात स्वतची ओळख निर्माण करणाऱ्या महादेव जानकर यांच्या गावात गेल्यावर त्यांच्या घरी जावं अस मला वाटलं. विचारत घरी गेलो. घराच्या समोर गेलो तर हे घर त्यांचं असेल हे पटत नव्हतं. कारण हे घर एकदम साधं होतं. घराच्या समोर एक आजी बसलेल्या. या जानकर यांच्या आई होत्या. आजींच्या जवळ बसून मी महादेव जानकर यांचा प्रवास समजून घेऊ लागलो. आजीबाईंनी सांगितलेली गोष्ट ऐकून जानकर यांच्याबद्दल मनात खूपच आदर निर्माण झाला.
महादेव जानकर यांचे थोरले भाऊ दादा जानकर हे मुंबईला नोकरीस होते. त्याना दोन भाऊ एक महादेव आणि दुसरे सतीश. आपण गरिबीमुळे शिकू शकलो नाही. आपल्या भावांने शिकावे, मोठे व्हावे, कुटुंबाला हातभार लावावा. घरची गरिबी दूर करण्यासाठी भाऊ शिकला पाहिजे आणि त्याने चांगली नोकरी केली पाहिजे. हा त्यांचा विचार होता. मात्र भविष्यात वेगळंच घडत गेलं. अभियांत्रिकीची पदवी मिळवलेल्या महादेव जानकर हे बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांच्या सहवासात गेले. तिथं त्याना आपल्या समाजाच्या उन्नतीची चावी दिसली. त्यांच्या विचाराने प्रभावित होऊन त्यानी फुलेवादावर आधारित चळवळ उभा केली. समाजातील लोकांना शिक्षणाचे महत्व सांगताना,”प्रसंगी मेंढरं विका पण आपल्या पोराला शिकवा.” अस सांगितले. चळवळ गतिमान होण्यासाठी ते संपूर्ण महाराष्ट्रात फिरले. याच काळात म्हसवड येथे झालेल्या एका सभेत त्यानी, “लग्न न करण्याचा आणि आयुष्यात घरात कधीही पाऊल न ठेवण्याचा” निर्धार जाहीर केला. हजारो लोकांच्या समोर त्यानी केलेला निर्धार ऐकून त्यांच बंधू दादा जानकर हादरून गेले. ते या सभेला गेलेले. तिथून घरी आल्यावर त्यानी आईला महादेव जानकर यांचा निर्णय सांगितला. तो निर्णय ऐकून आईला काय वाटले असेल याचा विचार आपण करू शकत नाही.
त्यानंतर महादेव जानकर यांनी कधीही घराची पायरी चढली नाही. तेव्हा संपर्काची साधने नव्हती. त्यामुळे आई किंवा भावाला ते कोठे आहेत याचा पत्ता लागला नाही. दोन वर्षे काहीही माहिती नव्हते. आई सतत काळजी करायची. देवाजवळ हात जोडायची. पण त्यांचा काहीही तपास लागला नाही. एक दिवस त्यांचे भाऊ शेजारच्या घरात बसले असताना बातम्या लागल्या. त्या बातमीत नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची बातमी आली. त्यात उमेदवारांची नावे सांगताना महादेव जानकर असे नाव ऐकल्यावर भावाला खूप आनंद झाला. भाऊ निवडणुकीत उभा आहे म्हणून नाही तर भाऊ सुखी आहे म्हणून. मग पळत येऊन त्याने आपल्या आईला ही गोष्ट सांगितली. आईला आनंद झाला.
जानकर यांच्यावर खूप प्रेम करणारे त्यांचे एक चुलते होते. त्यांच्या निधनाची बातमी सुद्धा त्याना वेळेत मिळाली नाही. कारण ते कोणत्या गावात असली यांचा काहीही पत्ता नसायचा. समाज जागा झाला पाहिजे म्हणून हा माणूस वेड्यासारखा फिरत होता. मैलोनमैल प्रवास करत होता. एक नवं राजकारण उभं करत होता. त्यांच्या चुलत्यांच्या निधनाची बातमी त्याना खूप उशिरा मिळाली. ते गावाकडे आले आणि धाय मोकलून रडू लागले कारण लहानपणापासून ज्या चुलत्यानी जीवापाड प्रेम केले होते त्यांचे अंत्यदर्शन सुद्धा घेता आले नव्हते.
अनेकांना महादेव जानकर यांचा त्याग माहिती नाही. हा माणूस काही एका दिवसात नेता झालेला नाही. कार्यकर्ता तयार व्हायला दहा वर्षे तर नेता तयार व्हायला वीस वर्षे लागतात. प्रतिकूल परिस्थितीच्या भट्टीतून तावून सुलाखून निघालेला हा माणूस आहे. वडिलांच्या पाठीमागे मेंढ्या राखायला जाणाऱ्या एका छोट्या खेड्यातील माणसाचा प्रवास थक्क करणारा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात जानकर यांनी रान उठवले, गेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात त्यानी निवडणूक लढवली. ही निवडणूक देशात लक्षवेधी ठरली होती. अगदी अनेकदा जानकर यानी पवार यांच्या गावाजवळ जाऊन टिका केली. हा राजकीय विरोध असतानाच शरद पवार साहेबांच्या विरोधात लढणाऱ्या महादेव जानकर यांचं सातारा येथील पवार यांच्या सत्कार समारंभातील भाषण ऐकले तर जानकर यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येईल. पवारसाहेब, अजितदादा सुप्रियाताई यांच्याबद्दल ते ज्या जिव्हाळ्याने बोलले आहेत तो पाहून त्यांच्यातील राजकीय सुसंस्कृतपणा किती उच्च दर्जाचा आहे हे समजेल. विरोधकावर टिका करताना आणि त्यांच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक करताना ते कधीही हातचे राखत नाहीत.
माणदेशातील पळसावडे या गावातील हा तरुण चळवळ उभारतो. पक्ष काढतो या पक्षाचे देशभर नेटवर्क उभा करतो आणि कितीही मोठा झाला तर त्याचे पाय जमीनीवर असतात आणि भाषा तीच रांगडी असते म्हसवडच्या शिवारात बोलली जाणारी. महादेव जानकर या व्यक्तीच्या राजकीय भूमिकेबाबत मतभेद आहेत पण या माणूस जिथून आलाय आणि जिथे पोहोचला आहे त्याच्या प्रवासाचा माणदेशी माणसांवर प्रेम करणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांला अभिमान आहे.
ज्यादिवशी महादेव जानकर मंत्री झाले त्यादिवशी त्यांची आई पहिल्यांदा मुंबईला आली होती. अवघ आयुष्य समाजासाठी दिलेल्या आणि कुटूंबाची परवड केलेल्या पोरांन त्या म्हातारीला खरा आनंद त्यादिवशी मिळवून दिला होता. टीव्हीच्या कॅमेरापुढं बोलताना म्हातारी गोंधळली होती. तिचा पोरगा पुढं मंत्रिपदाची शपथ घेत होता त्याचवेळी त्या म्हातारीला एक प्रसंग आठवला. सातारजवळ एका गावात मेंढरं बसलेली. आई वडिलांना भेटायला शाळकरी महादेव मेंढरं कुठं बसली आहेत हे हुडकत आलेला. उन्हाचा रखं होता.हातात पुस्तकांची पिशवी. आणि अनवाणी पायाने येणार पोरग. झपझप पाय उचलत होतं. तेच पोरग आज मंत्री झालेलं.
म्हातारीजवळ बसलो. तिने अनेक गोष्टी सांगितल्या. मी राज्याच्या मंत्रीमहोदयाच्या घरासमोर होतो हे पटत नव्हतं. कारण घर साधं कौलारू. याच घरातील एक सदस्य राज्याच्या मंत्रिमंडळात होता हे पटत नव्हतं. कारण अस चित्र दुर्मिळच असत. सरबत पिलो.आणि म्हातारीच्या पाया पडून निघालो.
ऊन खाली झालं होतं. गावाच्या बाहेर आलो. दूर शिवारात एक गुराखी गुर राखत होता. मग आजीनं मघाशी सांगितलेलं आठवल ‘महादेव जानकर यांनीही विद्यार्थी असताना अशीच गुरही राखली होती. ‘मी त्या विचारात शिवारात हरवून गेलो. दूर दूर पसरलेला अफाट माणदेश पाहू लागलो.
( संपत मोरे यांच्या फेसबुक वॉल वरून साभार )