हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापुरातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला असून माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा विजय झाला आहे. आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागली होती. अखेर संस्था गटातून महादेवराव महाडिक यांनी दणदणीत विजय मिळवून सतेज पाटील याना धक्का दिला आहे. आत्तापर्यंत एकूण 9 पैकी 6 गटांवर महाडिक गटाने विजय मिळवला आहे.
राजाराम साखर कारखान्यासाठी 91.12% मतदान झाले होते. सतेज पाटील आणि महाडिक गट यांच्यामध्ये जोरदार प्रचार आणि आरोप प्रत्यारोप सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहेत. आज मतमोजणी दरम्यान, संस्था गटातून महादेवराव महाडिक यांना 83 मते मिळाली तर विरोधी उमेदवार सचिन पाटील यांना 44 मतं मिळाली आहेत. त्यामुळे महादेवराव महाडिक यांचा 39 मतांनी विजय झाला आहे.
महादेवराव महाडिक यांच्या विजयानंतर महाडिक समर्थकांनी राजाराम साखर कारखाना परिसरात एकच जल्लोष केला आहे.या विजयानंतर महादेवराव महाडिक यांनी सतेज पाटील यांना डिवचलं आहे. कारखान्याच्या निवडणुकीत कंडका कुणाचा पडला हे दाखवा,असं महाडिक म्हणाले. सगळे कंडके पडले त्या लाकडात आता काय राहिलं नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे.