सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात महाराणा प्रताप यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्यांवर आणि गोरक्षकांवर प्राणघातक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज राष्ट्रीय हिंदु आंदोलन, हिंदू जनजागृती समिती आणि शिवसेनेच्यावतीने मारुती चौकात निदर्शने करण्यात आली.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे, हिंदू रक्षक महाराणा प्रताप नसते तर आज हिंदू समाज अस्तित्वात नसता, अशा या महाराणा प्रताप यांचा बालभारतीच्या इयत्ता सातवीच्या इतिहासात आणि नागरिक शास्त्र या पुस्तकात एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. महाराणा प्रताप यांची महानता लक्षात घेता बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात जो एकेरी उल्लेख करण्यात आला होता त्यातून त्यांचा अवमान झाला आहे.
पाठ्यपुस्तकात राष्ट्रपुरुषा विषयी चुकीचा उल्लेख केल्याप्रकरणी बालभारतीने हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी तसेच महाराष्ट्र शासनाने गोहत्याबंदीचा कायदा केल्याने गोवंशहत्या आणि गोतस्करी बंद होईल अशी अपेक्षा होती मात्र प्रत्यक्षात असे झालेली दिसत नाही, याउलट गोरक्षकांवर हल्ले वाढत आहेत.
जीवाची पर्वा न करणार्या गोरक्षकांना आज कोणती संरक्षण नाही, गोरक्षकांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व देशभरातील अवैद्य कत्तलखाने तात्काळ बंद करण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत, तसेच डॉक्टर दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या अभिवक्ता संजीव पुनाळेकर यांना जामीन मिळाला असला तरी त्यांच्यावर गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत या मागण्यांसाठी आज राष्ट्रीय हिंदु आंदोलन, हिंदू जनजागृती समिती आणि शिवसेनेच्यावतीने मारुती चौक येथे निदर्शने करण्यात आली.