पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसची पुणे उपनगरात भाजपमुळे गंभीर परिस्थिती झाल्याचे चित्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळीच दिसले होते. एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानण्यात येते आहे.
राष्ट्रवादीचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार प्रशांत शितोळे यांनी उमेदवारी अर्जाला पक्षाचा एबी फॉर्म नजोडल्याने त्यांचा अर्ज छाननीत बाद झाला आहे. यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवारी अर्ज बाद होणे देखील भाजपच्या लक्ष्मण जगताप यांच्या पथ्यावर पडले आहे. एकंदरच राष्ट्रवादीला मोठ्या नामुष्कीचा सामना करावा लागला आहे.
चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाला उमेदवार मिळत नव्हते. सरते शेवटी प्रशांत शितोळे याच्या गळ्यात राष्ट्रवादीने चिंचवडची उमेदवारी अडकवली. तर भोसरीत राष्ट्रवादीला उमेदवारच मिळाला नाही. त्यामुळे विलास लांडे या अपक्ष उमेदवाराला राष्ट्रवादीने पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे. अशा सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा चिंचवड मधून अर्ज बाद होणे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आहे.